Pune Children Festival 2025 | पुणे बाल महोत्सवाचे उद्घाटन | यावर्षी उत्सवाची संकल्पना “कमी स्क्रीन, अधिक खेळ”
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’च्या चौथ्या पर्वाचे उद्घाटन आज सकाळी १०:३० वाजता सारसबाग येथे पुणे अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर (IAS), साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्य लेखक राजीव तांबे आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. (Pune News)
दरवर्षी हा उत्सव शहरभरातून १.५ लाखांहून अधिक पालक आणि लहान मुलांना आकर्षित करतो, ज्यामध्ये त्यांना पालक, नवजात शिशु, लहान मुले यांच्यासाठी विशेषतः तयार केलेल्या विविध उपक्रमांचा अनुभव घेता येतो. यावर्षी उत्सवाची संकल्पना आहे “कमी स्क्रीन, अधिक खेळ”, ज्यामध्ये पालकांच्या आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य आणि कल्याणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे – जे लहान बालकांच्या विकासात महत्त्वाचे असले तरी अनेकदा दुर्लक्षित राहते. या कार्यक्रमाचा उद्देश पालकांमध्ये त्यांच्या मुलांचे हे सुरवातीच्या वर्षांमध्ये (० ते ६ वर्ष) या काळात संगोपन आणि त्यांचे विविध पहिलु कसे आणून किती महत्त्वाचे आहे याबाबत जागरूकता निर्माण करणे आहे.
प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील सुरुवातीची वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात कारण पहिल्या पाच वर्षांत त्यांची संज्ञानात्मक, सामाजिक आणि हालचाल, पंचेद्रियाची पकड ज्यामध्ये बोलणे, धावणे, पंचेद्रियामधील संतुलन, इत्यादी शारीरिक आणि त्याचा बरोबरीने बौद्धिक कौशल्ये झपाट्याने विकसित होतात. आपल्या शहराचा जलद गतीने विकास होत आहे, या डिजिटल युगातील पालक आणि मुले या गतीशी कसे जुळवून घेत आहेत यावर विचार करण्याची अत्यंत गरज आहे. पालकत्वाची पद्धत अधिक चांगली झाली आहे का, की पालक पूर्वीपेक्षा अधिक थकलेले वाटत आहेत? ते कदाचित शारीरिक अथवा मानसिक असू शकेल. त्यामुळे सध्या पालकांना त्यांच्या मुलांच्या विकासासाठी विविध पर्यायांची आणि मार्गाची माहिती देणे आणि त्यांच्या स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य संतुलित राहण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची जाणीव करून देणे आवश्यक असल्याचे ओळखून, शहरात लहान बालकांच्या विकास क्षेत्रात काम करणाऱ्या ३० पेक्षा जास्त सामाजिक आणि शासकीय संस्थांना एकत्र आणून कुटुंबांसाठी माहितीपूर्ण, खेळकर आणि संस्मरणीय अनुभव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पालकांसाठी आयोजित विविध सत्रांमध्ये डिजिटल युगातील पालकत्व आणि सुरुवातीच्या काळात वडील-मुलाचे संवाद अधिक सक्षम आणि सुदृढ करणे या सारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. हा उत्सव कुटुंबांना लहान बालकांच्या सुरुवातीच्या वर्षांचे महत्त्व समजावून सांगण्याचा आणि त्यांना विविध संसाधने व त्याकरीता काम करणाऱ्या विविध संस्थांचा कामाचा परिचित करून देण्याचा प्रयत्न आहे.
‘नर्चरिंग नेबरहूड्स २.०’ उपक्रमांतर्गत पुणे हे ‘डीप डाईव्ह’ अत्यंत महत्वाचे शहर असून ‘अर्बन९५’ लाइटहाऊस शहर म्हणून पालकांच्या कल्याण आणि लहान बालक-केंद्रित दृष्टिकोन शहर नियोजनात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील सुरू असलेल्या आणि आगामी प्रकल्पांमध्ये हा दृष्टिकोन समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पांच्या पलीकडे जाऊन, शहराने बालक-पालक मेळावे परिसरातील उद्यानांमध्ये आयोजित करून पालक आणि मुलांमधील संवाद वाढविण्याचे प्रभावी मार्ग दाखवले आहेत आणि अशा मैदानी उपक्रमांना शहरात प्रोत्साहन दिले जात आहे.
पुणे किड्स फेस्टिव्हल मध्ये आजच्या काळात पालक व्यस्त वेळापत्रक सांभाळत असताना आणि मुले घरात अधिक वेळ घालवत असताना, हा उत्सव सक्रिय, स्क्रीन-मुक्त सहभाग आणि सकारात्मक पालकत्वाच्या पद्धतींचे महत्त्व अधोरेखित करण्याचा आणि. कुटुंबे, तज्ञ आणि संस्था यांना एकत्र आणून शहरातील लहान नागरिकांसाठी अधिक निरोगी, आनंदी सुरुवात घडविण्याचा पुणे महानगरपालिका प्रयत्न करत आहे.

उद्घाटन सोहळ्यात बोलताना पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर (IAS) म्हणाल्या, “मी तुम्हा सर्वांचे पुणे किड्स फेस्टिव्हलच्या चौथ्या पर्वात स्वागत करते. यावर्षीच्या फेस्टिव्हलचा उद्देश कुटुंबांनी स्क्रीन टाईम कमी करून आणि अधिकाधिक खेळ खेळणे एकमेकांना अधिक कुटुंबिक वेळ द्यावा हा आहे. हा विषय फक्त मुलांसाठीच नाही तर त्यांच्या पालकांसाठीही महत्त्वाचा आहे. यावर्षी आम्ही फेस्टिव्हलमध्ये ‘केअर पॅव्हिलियन’ तयार केले आहे, जे पालकांना त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासावर विचार करण्याची, त्यातील आव्हाने समजून घेण्याची आणि स्वतःच्या आरोग्यासाठी उपाय शोधण्याची संधी देते. मी पुणेकर कुटुंबांना आवाहन करते की त्यांनी वेळ काढून आवर्जून फेस्टिव्हलला भेट द्यावी आणि ३० पेक्षा जास्त स्टॉल्सवरील आकर्षक उपक्रमांचा आनंद घ्यावा.”
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्य लेखक श्री. राजीव तांबे यांनी मुलांना काही लघुकथा सांगून त्यांचे लक्ष आणि कल्पनाशक्ती खेचून घेतली. फेस्टिव्हलचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, “बालपण हा मुलांच्या आयुष्यातील तसेच पालकांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. पालक मुलांना वाढवताना स्वतःही खेळकर राहणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मुले सतत सहभाग शोधत असतात आणि ते सक्षम करण्यासाठी आपण समाज म्हणून सर्वोत्तम मार्ग शोधणे अत्यावश्यक आहे. हा किड्स फेस्टिव्हल आपल्या आयुष्यात अधिक खेळ आणण्याची आठवण करून देतो.”
मुख्य अतिथी, प्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती मृण्मयी देशपांडे म्हणाल्या, “ पुणे महानगरपालिका पुणे किड्स फेस्टिव्हलच्या माध्यमातून बालपण व प्रारंभिक पालकत्व या कमी चर्चिलेल्या विषयावर प्रकाश टाकताना पाहून मला आनंद झाला. या क्षेत्रात अधिक जागरूकतेची गरज आहे. आपण मुलांकडे पाहतो तेव्हा त्यांच्या गरजा गृहीत धरतो. या प्रारंभिक वर्षांचा मुलांवर किती परिणाम होतो हे समजून घेतल्यास आपण एकत्रितपणे त्यांच्यासाठी चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलू शकतो. तसेच, प्रसूतीनंतरचा नैराश्य यांसारख्या पालकत्वातील आव्हानांवर चर्चा करणे आवश्यक आहे, जी अनेकदा दडपली जाते. हा किड्स फेस्टिव्हल पुणेकरांना या विषयांवर मजेदार आणि खेळकर पद्धतीने समज वाढवण्याची उत्तम संधी आहे. पुणे महानगरपालिकेने या दुर्लक्षित विषयावर आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आपली लहान मुले यांच्यासाठी काम करत असल्या बाबत खूप कौतुक वाटते, याच प्रकारे अधिक मोठ्या प्रमाणावर काम झाल्यास पुणे जसे पूर्वी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे तसे लहान मुलांसाठीचे शहर ओळखले जाईल अशी आशा करते.” हा फेस्टिव्हल ११ ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान लहान मुलांसह सर्व कुटुंबांसाठी मोफत आहे. पुणे महानगरपालिका सर्व पुणेकरांना मोठ्या संख्येने याला भेट देऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन या प्रसंगी मी सर्व पुणेकरांना करते.

COMMENTS