‘शांतता….पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाला भरभरून प्रतिसाद
| मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांचा उपक्रमात सहभाग
Pune Book Festival | पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या ( National Book Trust) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सव (Pune Pustak Mahotsav) १६ ते २४ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी गुरुवारी शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाला पुणे शहरात विविध चौकात, रिक्षा थांब्यांवर सरकारी – खासगी कार्यालये, महापालिकेचे क्षेत्रिय कार्यालये, शाळा- महाविद्यालयांमध्ये उस्फुर्तपणे राबविण्यात आला. त्याशिवाय नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजातून वेळ काढत विधानसभेचे सभापती अॅड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले. अनेक जणांनी सोशल मीडियावर पुस्तक वाचतानाचे फोटो शेअर करीत, पाठिंबा जाहीर केला. (Pune Book Festival)
वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाला शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सामाजिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालये, महापालिकेचे क्षेत्रिय कार्यालये, खासगी आस्थापनांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. त्यात पुणेकरांनी दुपारी १२ ते १ दरम्यान त्यांच्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन केले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात साधारण ५०० जणांनी आवडीचे पुस्तक वाचत सहभाग नोंदवला.शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, अधिकारी, पत्रकार, राजकीय पक्षाचे नेते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध देशपांडे, सिम्बायोसिस कुलपती डॉ.एस. बी मुजुमदार, बार्टीचे महासंचालक डॉ. सुनील वारे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन कोठावळे, सरहदचे संजय नहार, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. शिवाजीराव कदम, साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, अभिनेता प्रवीण तरडे, डॉ. मिलिंद जोशी, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी उपक्रमात सहभागी होत, वाचन संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन केले. अनेकांचा सहभाग होता. शांतता ..पुणेकर वाचत आहे या उपक्रमाला पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद आनंददायी आहे. अशा उपक्रमांनीच नवी पिढी वाचनाकडे वळणार आहे. तसेच वाचन संस्कृतीचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे, असे पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवातील कार्यक्रम १६ ते २४ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहेत. या उपक्रमाला पुणे महापालिका, उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यासह सुमारे २५० विविध संस्थांनी पाठिंबा दिला असून, तो वाढतच आहे.