Pune Airport New Terminal | आंतरराष्ट्रीय प्रवास होणार आणखी सुलभ | आंतरराष्ट्रीय उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरून
| केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Pune Airport News – (The Karbhari News Service) – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरुन होणारी सर्व उड्डाणे आता नव्या टर्मिनल वरून होणार असून याची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिली. उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला. (Pune News)
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आले असून या टर्मिनलवरुन होणाऱ्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली आहे. मात्र इमिग्रेशनच्या यंत्रणेबाबतची निर्माणाधीन प्रक्रिया आता पूर्णत्वास गेली आहे. मंत्री मोहोळ यांनी या सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला आणि तांत्रिक बाबींसंदर्भात माहितीही घेतली.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पुणे विमानतळावरुन आताच्या घडीला एकूण ३ मार्गांवरून ५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु असून ही सर्व उड्डाणे नव्या टर्मिनलकडे स्थलांतरित करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी पुणेकर प्रवाशांसाठी आजवर जुनेच टर्मिनल वापरले जात होते, ज्यावर अद्ययावत सुविधांचा अभाव होता. आता मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात सुखकर होणार आहे.’
‘इमिग्रेशन संदर्भातील तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्वास नेऊन नवे टर्मिनल आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुणे विमानतळाच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देण्याची मालिका अशीच अखंडित राहील’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.
COMMENTS