महानगरपालिकेत अत्यावश्यक सेवेसाठी कायमस्वरूपी M.B.B.S डॉक्टरची व ॲम्बुलन्सची व्यवस्था करा
: शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांची मागणी
पुणे : पुणे महानगरपालिका आवारात आरोग्य विषयक कोणती घटना घडल्यास तातडीने आरोग्य विषयक सेवा देणारी व्यवस्था नाही. मागील एक वर्षात नगरसेवक, पालिकेचे कर्मचारी, येणारे नागरिक यांच्याबाबत अशा काही घटना घडल्या आहेत की त्यांना प्रशासन आरोग्य विषयक कोणत्याही तातडीच्या सुविधा पुरवू शकले नाही व हे निश्चितच संतापजनक आहे, त्यामुळे महानगरपालिकेमध्ये तातडीने कायमस्वरूपी M.B.B.S डॉक्टरची व ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी शिवसेना गटनेते नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आलेल्या निवेदनात सुतार यांनी म्हंटले आहे की, महानगरपालिकेमध्ये रोज हजारो नागरिक, लोकप्रतिनिधी येत असतात. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना जर आरोग्याशी निगडीत कोणतीही अपत्कालीन मदत लागली तर ती देण्याची व्यवस्था महापालिकेत नाही.
पालिकेत स्ट्रेचरची व्यवस्था नसल्यामुळे कोणती घटना घडल्यास रुग्ण व्यक्तीला झोळीमध्ये घेऊन जावे लागते. तसेच ॲम्बुलन्स नसल्यामुळे कोणाच्यातरी गाडीची वाट पहावी लागते आणि डॉक्टर कायमस्वरुपी नसल्यामुळे त्यांना डॉक्टर शोधण्यास धावाधाव करावी लागते. यामुळे सदरच्या रुग्णाच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. आरोग्य विषयक तातडीने सेवा देण्याची व्यवस्था महापालिकेत नसणे हे खेदजनक आहे.
तरी आमची शिवसेना पक्षाच्या वतीने मागणी आहे की आपण त्वरीत एक महिला व पुरुष डॉक्टर यांची नेमणूक करावी.त्याचबरोबर एक ॲम्बुलन्स पालिकेच्या आवारात तैनात करावी व एक बेसिक उपचारासाठी OPD ची व्यवस्था करावी. या मागणीची त्वरीत अंमलबजावणी करावी नाहीतर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा पृथ्वीराज सुतार यांनी दिला आहे.
COMMENTS