प्रा.आदिनाथ भाकड यांना हिंदी विषयात पीएच.डी प्रदान
पुण्यातील मराठवाड़ा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स,डेक्कन जिमखाना, पुणे येथील हिंदी विषयाचे शिक्षक श्री. आदिनाथ शेषराव भाकड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मानव्याविद्या शाखा अंतर्गत हिंदी विषयातील पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.
भाकड यांनी “इक्कीसवीं सदी के आदिवासी उपन्यासों का विश्लेषणात्मक अध्ययन”(प्रातिनिधिक हिंदी उपन्यासों के परिप्रेक्ष्य में)या विषयावरील शोध प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता.त्यांना पीएच. डी.पदवी संशोधन कार्यासाठी अहमदनगर महाविद्यालयातील तुलनात्मक साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.साताप्पा चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा.भाकड हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे शिक्षण हे ग्रामीण भागात झाले आहे.ते अत्यंत मेहनती आहेत. त्यांचे अनेक संशोधन लेख राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकांमधून प्रकाशित झाले असून त्यांचे संदर्भ ग्रंथ विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. विविध पुरस्कारांनी सन्मानित प्रा.भाकड यांच्या या यशाबद्दल मराठवाडा मित्र मंडळ संस्थचे कार्याध्यक्ष श्री.बी.जी.जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार, अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी विभाग प्रमुख डॉ.विजयकुमार रोडे, डॉ. महेश दवंगे, युवा नेते संजय डोळसे,डॉ दिलीप नलगे, रस्तापुर वि. सहकारी सोसायटीचे माजी चेअरमान सुखदेव भाकड, रस्तापुर वि. सहकारी सोसायटीचे संचालक भरत भाकड यांनी अभिनंदन केले.
भाकड यांना यापूर्वी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्याच्या शैक्षणिक वाटचालीचे समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.