२७ दिवसांनी पहिली आढावा बैठक घेतली, त्याबद्दल मनापासून आभार
| पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रशांत जगताप यांचे खुले पत्र
पुणेकरांना होणाऱ्या त्रासाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये जगताप यांनी पालकमत्र्यांनी २७ दिवसांनी पहिली आढावा बैठक घेतली, त्याबद्दल मनापासून आभार मानले आहेत.
| असे आहे पत्र
मा.ना.श्री. चंद्रकांतदादा बच्चू पाटील
(पालकमंत्री, पुणे जिल्हा)
आदरणीय चंद्रकांतदादा,
सप्रेम नमस्कार,
आपणास व आपल्या कुटुंबीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अर्थात आपली दिवाळी सुरू झाली असेल,आम्ही पुणेकर मात्र अजूनही ट्रॅफिक जॅम मध्येच आहोत.
पत्रास कारण की,
आपण गेल्या आठवड्यात पालकमंत्री झाल्यानंतर तब्बल २७ दिवसांनी पहिली आढावा बैठक घेतली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. किमान गुडघाभर पाण्यात पोहल्यानंतर तरी पुणेकरांचा कोणीतरी वाली असून आढावा बैठकीत काहीतरी चांगले निर्णय होतील अशी आम्हाला अपेक्षा होती.
मागील आठवड्यात पाण्यामुळे अतोनात नुकसान झालेल्या पुणेकरांना या आठवड्यात दिवाळीची चाहूल लागली होती, त्यामुळे सर्वसामान्य चाकरमाने- गोरगरीब- पुणेकर खरेदीसाठी रस्त्यांवर आले आणि पुन्हा नियोजन नसलेल्या प्रचंड ट्रॅफिकचा पुणेकरांना सामना करावा लागत आहे.
पुणे शहरातून जाणाऱ्या मुंबई महामार्ग, सोलापूर महामार्ग, नगर रोड, सातारा रोड, सासवड रोड या सर्व रस्त्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असून ही ट्रॅफिक कंट्रोलच्या बाहेर गेली आहे. पुणे शहराबाहेर जाणाऱ्या सर्वच महामार्गांवर टोल नाक्यांवर दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागत असून आपल्या लोकप्रिय घोषणा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी जर किमान दिवाळी पुरते टोल माफी केली तर, नागरिकांचे पैसे वाचण्यापेक्षा नागरिकांचा वेळ वाचेल त्यामुळे टोल माफी करण्यात यावी एवढी माफक अपेक्षा.
नागरिकांना येरवडा ते वाघोली हे ११ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल २ तास लागत आहेत. हीच परिस्थिती शहरातील प्रत्येक रस्त्यावर असून या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शहरातील वाहतुकीचे पुन्हा एकदा नियोजन करण्यात यावे.
सीसीटीव्ही द्वारे ट्रॅफिकचे नियोजन होईल तेव्हा होईल, आता मात्र असे प्रयोग करत बसण्यापेक्षा प्रत्येक जंक्शनला ट्रॅफिक
पोलीस नेमण्यात यावे ही आपणास एक त्रस्त पुणेकर म्हणून मागणी करत आहे.
त्याचप्रमाणे जे पुणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे बाहेरगावी जात आहेत त्यांना देखील प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या बसेसचे देखील नियोजन झालेले नाही. शिवाजीनगर व स्वारगेट या दोन्ही प्रमुख बस स्थानकांवर हजारो प्रवासी ताटकळत उभे आहेत. दिवाळीची गर्दी पाहता या दोन्ही बस स्थानकाजवळील काही मैदानांमध्ये बसेसची व्यवस्था करत व्यवस्थित नियोजन करायला हवे होते परंतु ते झालेले दिसत नाही. या बस स्टँडच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून येथे देखील तात्काळ ट्रॅफिक
पोलीस नेमण्यात यावे.
काल पुणे स्टेशन येथे रेल्वेमध्ये चढताना एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला कदाचित नियोजन व्यवस्थित झाले असते तर तो एक जीव आपल्याला वाचवता आला असता.
दिवाळीच्या निमित्ताने आपल्या सरकारने घोषणा केलेल्या “आनंदाचा शिधा किराणा किट” ही योजना देखील पूर्णपणे फसलेली असून, शहरातील तब्बल ६०% दुकानांवर अजूनही या किट पुरेश्या उपलब्ध नाहीत. जिथे उपलब्ध आहेत तेथे सर्व्हर डाऊन असल्याने संबंधित किट पैसे देऊनही मिळत नाहीत. कित्येक ठिकाणी शंभर रुपये घेऊन पाच ऐवजी केवळ तीन किंवा चार वस्तू दिल्या जातात. तर या आनंदाच्या शिध्यामुळे जी नियमित धान्य वितरण प्रणाली सुरू होती ती सुद्धा पूर्णपणे कोलमडलेली आहे. आपण जर या गोष्टीचे योग्य नियोजन केले असते तर आज योग्य वेळेत पुणेकरांची दिवाळी गोड करता आली असती.
बाकी आपण कोल्हापुरात आहात की पुण्यात माहित नाही, परंतु शक्य झाल्यास पुणेकरांची या सर्व त्रासातून सुटका करावी एवढीच कर्तव्यदक्ष पालकमंत्री म्हणून आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो.
– प्रशांत जगताप
माजी महापौर तथा अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.