PMRDA | Supriya Sule | पीएमआरडीए क्षेत्रामधील घरकुलासाठी आर्किटेक्टच्या डीपीआरची अट रद्द होणार
| स्वतः पीएमआरडीएच डीपीआर करणार असल्याचे खा. सुळे यांना आयुक्तांचे आश्वासन
PMRDA | Supriya Sule | पुणे : पीएमआरडीए क्षेत्रामध्ये (PMRDA Area) घरकुल मागणी करताना त्याचा डीपीआर (DPR) आर्किटेक्टकडून करून घेण्याची अट आहे, ती अट रद्द करून स्वतः पीएमआरडीएनेच घरकुलाचे प्लॅन तयार करुन मंजूरी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या सूचनेला पीएमआरडीएने आज मान्य केले असून घरकुलाच्या परवानग्या घेणे आता सोपे होणार असल्याचे मानण्यात येत आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या पुरंदर, खडकवासला विधानसभा, मुळशी आणि दौंड तालुक्यातील विविध विषयांसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल (IAS Rahul Mahiwal) यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीत महिवाल यांनी घरकुलाबाबतची ही सूचना मान्य केल्याचे सुळे यांनी सांगितले. (PMRDA Pune)
पीएमआरडीए मध्ये घरकुल मागणी करताना घरकुलाचा डीपीआर आर्किटेक्टकडून करून घेण्याची अट आहे, ती अट रद्द करण्याची मागणी सुळे यांनी केली. पीएमआरडीएनेच घरकुलाचे प्लॅन तयार करुन मंजूरी द्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी मांडली. आयुक्तांनी ती मागणी तात्काळ मान्य केली असून आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यासाठी आपण त्यांचे आभार मानतो, असे सुळे यांनी नमूद केले. पीएमआरडीएचे अन्य अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष सोपान(काका) चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, महादेव कोंढरे, भरत झांबरे, सुधाकर गायकवाड, खुशाल कारांजावणे आदी पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.