PMRDA Pune | पीएमआरडीएचे अधिकारी सोमवार, गुरुवारी नागरिकांना भेटणार
| नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगर आयुक्त यांचा निर्णय
Pune PMRDA – (The Karbhari News Service) – नागरिकांना आपल्या अडचणी, समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडता याव्यात, या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सर्व विभागप्रमुख आठवड्यातील दोन दिवस नागरिकांच्या भेटीसाठी पूर्ण वेळ कार्यालयात उपलब्ध असणार आहे. या निर्णयाची गेल्या काही दिवसांपासून पीएमआरडीएमध्ये अंमलबजावणी करण्यात येत असून त्या अनुषंगाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी आदेश काढले आहेत. शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत कार्यालयीन स्तरावर काही निर्णय घेण्यात आले असून नागरिकांच्या सोयीसाठी त्यातील हा एक महत्वपुर्ण निर्णय आहे. (Pune News)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात आपल्या कामानिमित्त अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समन्वय राहावा, या उद्देशाने आठवड्यातील पूर्ण दोन दिवस (सोमवार आणि गुरुवार) महानगर आयुक्त यांच्यासह सर्व विभागप्रमुख कार्यालयात नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार आहे. यामुळे नागरिकांना आपल्या अडचणी, समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडण्याची संधी मिळणार आहे.
पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने स्थळ पाहणी तसेच क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्यासाठी बुधवार आणि शुक्रवार निश्चित करण्यात आला आहे. यासह विभागप्रमुखांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी यांना भेटण्यासाठी मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. अधिकारी कर्मचारी यांच्या जेवनाची वेळ पण निश्चित केली असून ती दुपारी दीड ते दोन असणार आहे. पीएमआरडीएमध्ये येणाऱ्या नागरिकांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सोमवार किंवा गुरुवारी कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन पीएमआरडीएतर्फे करण्यात आले आहे.
संपर्कासाठी आकुर्डी कार्यालयाचा नंबर : ०२० – २७१६६०००
संपर्कासाठी औंध कार्यालयाचा नंबर : ०२० – २९९९१२७७

COMMENTS