PMC Vs Pune Irrigation | पाटबंधारे विभाग म्हणतो ९३२ कोटी थकबाकी | पुणे मनपा म्हणते आम्ही ४११ कोटी बिलापेक्षा जास्त दिले
Pune Water Supply – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आणि पुणे पाटबंधारे विभाग यांच्यात पाणी वापर आणि पाणीपट्टी थकबाकी वरून शीतयुद्ध सुरू आहे. पाटबंधारे विभागाने ९३२ कोटींची थकबाकी पुणे मनपाकडे असल्याचे सांगत पाणी तोडण्याचा इशारा दिला आहे. यावर पुणे मनपाने देखील पाटबंधारे ने चुकीची बिले दिली असल्याचा दावा करत बिलापेक्षा ४११ कोटी रुपये जास्त दिले असल्याचा दावा केला आहे. याबाबत महापालिकेने राज्याचे अपर मुख्य सचिव यांना देखील अवगत केले आहे. (PMC Water Supply Department)
पाटबंधारे विभागाने महापालिकेला नुकतेच एक पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, खडकवासला प्रकल्पातून महापालिकेला ११.६० टीएमसी इतका पाणी कोटा मंजूर आहे. मात्र महापालिकेने 2024-25 सालात २०.४४ टीएमसी पाणी वापरले आहे. म्हणजे ८.८४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरले आहे. महापालिकेच्या ज्यादा पाणी वापराने सिंचनास पाणी देणे जिकिरीचे होते आहे. 2025-26 चा देखील पाणी कोटा संपत आला आहे. आता महापालिकेने ११.२३ TMC पाणी वापरले आहे. हा कोटा संपल्या वर पाणीपुरवठा खंडित केला जाईल. खडकवासला तून पाणी उचलता येणार नाही. त्यामुळे दुसरी सोय महापालिकेने करावी, असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. तसेच ९३२ कोटींची थकबाकी तत्काळ भरण्याचे आदेश देखील दिले आहेत.
यावर महापालिका प्रशासन पेचात अडकले आहे. या आधी देखील पाटबंधारे विभागाच्या तक्रारीनंतर जलसंपदा विभागाच्या मुख्य अपर सचिव यांनी महापालिका आयुक्त यांना पत्र पाठवत थकबाकी भरण्याचे आदेश दिली होते.
त्यावेळी महापालिका प्रशासनाने अपर सचिव यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली होती. महापालिकेने म्हटले होते की, पाटबंधारे विभागाने दिलेली थकबाकी ही ज्यादा आणि अवाजवी असून थकबाकी भरणे मनपाच्या आर्थिक हिताचे नाही. त्यामुळे थकबाकी प्रलंबित आहे. पाटबंधारे विभागाने चुकीच्या पद्धतीने बिलाची आकारणी केल्याने ही थकबाकी अवाजवी दिसत आहे. पाणी कोटा देखील चुकीच्या पद्धतीने विचारात घेतला आहे. असे महापालिकेने म्हटले आहे. पुणे शहरात प्रक्रिया उद्योगाचा पाणीवापर हा शून्य असताना तो सरसकट ५% गृहीत धरला आहे. STP Penalty देखील चुकीच्या पद्धतीने आकारली आहे. असे मनपा ने म्हटले आहे.
महापालिकेने म्हटले आहे की, पाटबंधारे विभागाने सादर केलेले बिल, पुणे मनपा ने अदा केलेले बिल, एकूण थकबाकी याच्या तक्त्यानुसार पुणे मनपाने सुमारे ४११ कोटी जास्त बिल दिले आहे. याबाबत पाटबंधारे विभागाला कळवण्यात आले आहे. त्यामुळे बिलात दुरुस्ती करून बिले द्यावीत असे महापालिकेने म्हटले आहे.
यावर अपर सचिव यांनी महापालिकेला कुठलाही प्रतिसाद दिला नव्हता किंवा पाटबंधारे विभागाने बिले दुरुस्त केली नव्हती. उलट ९३२ कोटी थकबाकी भरण्यास आणि पाणी पुरवठा खंडित करायचा इशारा दिला आहे. यावर आता महापालिका वरीष्ठ अधिकारी आणि पाटबंधारे अधिकारी यांच्यात बैठक होणार आहे.

COMMENTS