PMC Sky Sign Department | पुणे महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत जाहिरातींसाठी ३८० जागा!
| रितसर परवानगी घेण्याचे महापालिका परवाना व आकाशचिन्ह विभागाचे आवाहन
Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या क्षेत्रियकार्यालय निहाय अनधिकृत जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, इ. मुळे होणारे विद्रुपीकरण रोखणे कामी तात्पुरत्या जाहिरातींसाठी बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स लावण्यासाठी जागा निश्चित करण्याबाबत सुचना केलेल्या आहेत. त्यानुसार पुणे महानगरपालिकेकडून सर्व क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत एकूण ३८० जागा तात्पुरत्या जाहिरातींसाठी बोर्ड, बॅनर, फ्लेक्स पोस्टर्स लावण्याकरीता जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. परवानगी घेऊन जाहिरात लावण्याचे आवाहन महापालिका परवाना व आकाशचिन्ह विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation- PMC)
पुणे महानगरपालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम २४४ व २४५ मधील तरतुदीनुसार पुणे महानगरपालिका हद्दीत नवीन जाहिरात फलक उभारणेस व नुतनीकरण देणेस मान्यता देण्यात येते. दरम्यान सुस्वराज्य फाउंडेशन, सातारा आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर मध्ये न्यायालयाने ३१ जुलै २०१७ रोजी सविस्तर आदेश निर्गमित केलेले आहेत. या आदेशांच्या अनुषंगाने शासनाकडून दि. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व महानगरपलिका, नगरपालिका व नगरपंचायती यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये जाहिरातींसाठी जागा निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निश्चित केलेल्या जागांची यादी पुणे महानगरपालिकेच्या (https://www.pmc.gov.in/) या संकेतस्थळावर नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच सर्व महापालिका सहायक आयुक्त कार्यालयांच्या दर्शनी भागात याबाबत माहिती लावण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत नागरिकांच्या सोईकरिता तात्पुरत्या जाहिरातींसाठी निश्चित केलेल्या जागांवर जाहिरात उभारणेस परवानगी संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडून प्राप्त करून घेऊनच व विहित केलेल्या शुल्काचा भरणा करून जाहिरात उभारणेस परवानगी देण्यात येणार आहे. यामध्ये विहित शुल्क भरून व जाहिरात फलक नियमन व नियंत्रण (आकाश चिन्हे) नियम २०२२ मधील नियमांनुसार जाहिरात असणे बंधनकारक आहे. असे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
या निश्चित केलेल्या जागांव्यतिरिक्त अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स पोस्टर्स लावणाऱ्यांवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे आदेश मे न्यायालयाने पारीत केलेले आहेत व त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तरी या पुढे पुणे शहरामध्ये वाढदिवसाचे फलक, शुभेच्छा फलक तसेच धार्मिक फलक व इतर कोणतेही
जाहिरात सदृशफलक लावणेकरीता पुणे महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रिय कार्यालयाच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाची रीतसर परवानगी घेऊन विहित शुल्काचा भरणा करून निश्चित केलेल्या जागांवर जाहिरातीस परवानगी देण्यात येईल. असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
——
COMMENTS