विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पुणे महापालिका सरसावली!
| पथ विभागाने वास्तुरचनाकाराकडून मागवले प्रस्ताव
पुणे | शालेय विद्यार्थ्यांचा शाळेत जातानाचा प्रवास सुखकारक व्हावा, तसेच त्यांना शाळेत एकटे जाताना वाहतुकीची कसलीही अडचण येऊ नये आणि विद्यार्थ्याने वाहतुकीसाठी कुणावरही अवलंबून राहू नये, यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी महापालिका एक वाहतूक आराखडा तयार करणार आहे. यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने खाजगी वास्तुरचना काराकडून प्रस्ताव मागवले आहेत. येत्या शुक्रवारी त्यातील तीन जणांचे प्रस्ताव अंतिम करून त्यानुसार त्याची लवकरच ट्रायल घेतली जाणार आहे. अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.
पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. इथे खूप शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे देश विदेशातून इथे विद्यार्थी शिकायला येत असतात. शिक्षणाच्या बाबतीत देश पातळीवर पुण्याचे नाव घेतले जाते. मात्र पुणे शहरात वाहतुकीची समस्या खूपच मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र त्या अपुऱ्या पडताना दिसून येतात. महापालिकेकडून करोडो खर्च करूनही वाहतूक समस्या तशीच आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना देखील शाळेत जाताना या समस्येला सामोरे जावे लागते. सायकलवर अथवा घरातून चालत शाळेत जाणे देखील पालकांना आणि विद्यार्थ्यांना भीतीदायक वाटते. त्यामुळे पालक पैसे खर्च करून आपल्या पाल्याला स्कूल van ने शाळेत पाठवतात. तसेच अपघाताचे देखील प्रकार पाहायला आढळतात. हीच समस्या महापालिकेच्या पथ विभागाने ओळखून त्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात विद्यार्थी कुठल्याही अडचणी शिवाय आणि कुणावरही अवलंबून न राहता बिनधास्तपणे शाळेत जाऊ शकेल. यासाठी पथ विभागाकडून आराखडा तयार केला जाणार आहे.
याबाबत पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी सांगितले कि, विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेऊन आम्ही हा प्रकल्प राबवणार आहेत. विदेशात school safe zone नावाची संकल्पना राबवली जाते. त्याच धर्तीवर आम्ही हा प्रकल्प साकारणार आहोत. यामध्ये कुठल्याही शाळेच्या परिसरातील १ किमी चा परिसर आम्हाला विकसित करायचा आहे. ज्यामध्ये ५ ते १२ वी पर्यंतचा कुठलाही विद्यार्थी आरामात सायकलवर किंवा चालत देखील आपल्या शाळेत जाऊ शकेल. यासाठी शहरातील ९ झोन आम्ही तयार केले आहेत. त्यानुसार खाजगी वास्तुरचना काराकडून प्रस्ताव मागवले होते. या ९ झोन मध्ये डेक्कन जिमखाना, हडपसर, लोहगाव-धानोरी, कोथरूड, वडगाव बुद्रुक, पर्वती-बिबवेवाडी, पाषाण, कोंढवा, आणि खराडी अशा झोन चा समावेश आहे. दांडगे यांनी सांगितले कि, आतापर्यंत ८ लोकांचे प्रस्ताव आम्हाला प्राप्त झाले आहेत. येत्या शुक्रवारी या सर्व प्रस्तावांची छाननी करण्यात येईल. त्यासाठी मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, पथ विभागातील प्रमुख अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांच्या उपस्थितीत हे प्रस्ताव अंतिम केले जातील. यामधील प्रमुख तीन प्रस्ताव अंतिम केले जातील. त्यानुसार डिसेंबर महिन्यात याची ट्रायल घेतली जाईल.