PMC Pune Budget 2026-27 | पीएमपी बळकटीकरणावर भर | मेट्रो विस्तारासह एकात्मिक वाहतूक आराखडा | ५४ किमी भुयारी रस्ते

Homeadministrative

PMC Pune Budget 2026-27 | पीएमपी बळकटीकरणावर भर | मेट्रो विस्तारासह एकात्मिक वाहतूक आराखडा | ५४ किमी भुयारी रस्ते

Ganesh Kumar Mule Mar 24, 2026 7:56 PM

Store Department | संतोष वारुळे यांच्याकडील मध्यवर्ती भांडार विभागाची जबाबदारी चेतना केरुरे यांच्याकडे!
TP Scheme PMRDA | टीपी स्कीमच्या माध्यमातून सुनियोजित शहर उभे करणार | शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन झाल्याशिवाय पीएमआरडीए पुढील प्रक्रिया करणार नाही
PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेत आणखी दोन उपायुक्त प्रतीनियुक्तीने!

PMC Pune Budget 2026-27 | पीएमपी बळकटीकरणावर भर | मेट्रो विस्तारासह एकात्मिक वाहतूक आराखडा | ५४ किमी भुयारी रस्ते

 

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) –  शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक गतिमान, सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात मेट्रो विस्तार, पीएमपी सक्षमीकरण आणि एकात्मिक वाहतूक आराखड्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत देण्याचाही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Pune PMPML, Metro, Underground Road)

सध्या पुणे मेट्रोच्या ३३.२८ किमी मार्गावरून दररोज सुमारे दोन लाख प्रवासी प्रवास करत असून, वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिका कार्यान्वित आहेत. या मेट्रोच्या विस्ताराला गती देत स्वारगेट ते कात्रज, खडकवासला ते खराडी, नळस्टॉप ते माणिकबाग आणि रामवाडी ते वाघोली या नवीन मार्गांचे काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच छत्रपती शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो मार्ग मे महिन्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. येत्या काही वर्षांत पुणे परिसरात सुमारे २०० किमी लांबीचे मेट्रो जाळे उभारण्याचा मानस आहे.

मेट्रो आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) यांच्यात एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करून प्रवाशांना ‘एन्ड टू एन्ड’ सेवा देण्यावर भर देण्यात येणार आहे. पीएमपी बस, ई-रिक्षा आणि ई-सायकल यांसारख्या फीडर सेवांच्या माध्यमातून प्रवास अधिक सुलभ करण्यात येईल. मेट्रो मार्गांच्या परिसरातील ‘टीओडी झोन’साठी सहा महिन्यांत सर्वंकष वाहतूक नियोजन आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच कोथरूड, वारजे आणि दांडेकर पूल येथे मेट्रो व उड्डाणपूलांचे एकत्रित नियोजन करण्यात आले आहे.

पीएमपीच्या सक्षमीकरणासाठी या वर्षी स्वमालकीच्या एक हजार सीएनजी बस आणि जीसीसी तत्त्वावरील ५९९ बस ताफ्यात दाखल होणार आहेत. केंद्र सरकारच्या फेम-२ योजनेअंतर्गत आणखी एक हजार बस उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पीएमपीचा सर्वसमावेशक बिझनेस प्लॅन तयार करण्यात आला असून, सुतारवाडी-पाषाण आणि निगडी येथील भक्ती-शक्ती डेपो येथे बीओटी तत्त्वावर डेपो व व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. शहरातील सर्व बसस्थानकांचे सक्षमीकरण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत ६० वर्षांवरील नागरिकांना पीएमपीच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा होणार आहे.
——–

५४ किमी भुयारी रस्ते, नदी पुनरुज्जीवन आणि गृहनिर्माण प्रकल्पांना चालना

 

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात ‘पाताळलोक’ अंतर्गत भुयारी रस्ते, बोगदे, उड्डाणपूल, नदी पुनरुज्जीवन आणि ‘रिव्हरफ्रंट एक्स्पिरियन्स पार्क’सारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ‘संकल्प ते सिद्धी’ या धर्तीवर विकासाचा रोडमॅप मांडला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे ५४ किमी लांबीचे भुयारी रस्ते उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात येरवडा ते कात्रजदरम्यान १४.५ किमी लांबीचा ट्विन टनेल उभारण्यात येणार आहे. तसेच शनिवारवाडा ते स्वारगेटदरम्यान भुयारी मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
शहराच्या विकास आराखड्यातील कोथरूड-पाषाण आणि हिंगणे-धनकवडी या दोन महत्त्वाच्या बोगद्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले असून, त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच या प्रकल्पांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

याशिवाय शहरात अनेक उड्डाणपूल, पूल आणि भुयारी मार्ग उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. घोरपडी रेल्वे पूल, आगाखान पॅलेस परिसरातील पूल, सनसिटी-कर्वेनगर पूल, साधू वासवानी पूल आणि विश्रांतवाडी उड्डाणपूल हे प्रकल्प लवकर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. शास्त्रीनगर, बिंदूमाधव ठाकरे चौक आणि सेनापती बापट चौक येथील उड्डाणपूल पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच मुंढवा-खराडी, चांदणी चौक-भूगाव आणि शिवणे-नांदेड सिटी जोडणाऱ्या प्रकल्पांसह अनेक नव्या कामांचीही घोषणा करण्यात आली आहे. गंगाधाम चौकातील उड्डाणपूल पीपीपी तत्त्वावर उभारण्यात येणार आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘पुणे रिव्हरफ्रंट एक्स्पिरियन्स पार्क’ हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यामध्ये स्काय व्हील, मल्टीमीडिया रिव्हर शो, झिपलाईन, कयाकिंग, स्कायवॉक आणि अॅडव्हेंचर झोनसारख्या सुविधा उपलब्ध असतील. यामुळे पुण्याचा पर्यटन नकाशावर ठसा उमटणार असून रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे.
मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रणासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत ११ पैकी १० मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची कामे अंतिम टप्प्यात आली असून, यंदा चार केंद्रे कार्यान्वित होणार आहेत. ५३ किमी मुख्य मलवाहिन्यांचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सेंट्रल स्काडा प्रणाली प्रस्तावित आहे.

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीकाठाचा विकास साबरमतीच्या धर्तीवर करण्यात येत असून, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, उद्याने आणि जॉगिंग पार्क विकसित करण्यात येत आहेत. संगमवाडी ते बंडगार्डन आणि पुढे मुंढवा हा टप्पा नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. सध्या ४४ किमीपैकी १७.८० किमी काम सुरू आहे. सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते पश्चिम बाह्यवळण मार्गावरील वारजेपर्यंतच्या ४.१० कि.मी. टप्प्यात नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

शहरातील पार्किंग समस्येवर उपाय म्हणून आरक्षित जागांवर पीपीपी तत्त्वावर बहुमजली पार्किंग विकसित करण्यात येणार असून, जीआयएस मॅपिंगद्वारे पार्किंग व्यवस्थापन अधिक सक्षम केले जाईल.
तसेच प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत बालेवाडी, धानोरी, कोंढवा, हडपसर आणि वडगाव येथे सहा गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येणार असून, ४७२५ घरे उभारली जाणार आहेत. याशिवाय मध्यवर्ती पेठांसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट आराखडाही तयार करण्यात येणार आहे.

शाश्वत ऊर्जेकडे पुण्याची वाटचाल; एलईडी, सौर प्रकल्प आणि ५० मेगावॅट वीज निर्मितीला चालना

पुणे : शहरात शाश्वत ऊर्जा वापर वाढविण्यासोबतच सुरक्षितता आणि वीज बचतीवर भर देत महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात एलईडी पथदिवे, सौर ऊर्जा प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणावर वीज निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ आणि पर्यावरण संवर्धन साध्य करण्याचा निर्धार स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला.

शहरातील निर्जन स्थळे आणि नवीन डीपी तसेच मिसिंग लिंक रस्त्यांवर चार हजार नवीन विद्युत पोल उभारण्याचे नियोजन असून, यामुळे सुमारे १०० किमी लांबीचे रस्ते प्रकाशमान होणार आहेत. तसेच जुन्या व अकार्यक्षम दिव्यांच्या ऐवजी ७५ हजार उच्च कार्यक्षमतेचे एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहेत.
महानगरपालिकेच्या विविध इमारती आणि जलशुद्धीकरण केंद्रांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, रिन्यूएबल एनर्जी सर्व्हिस कंपनी (रेस्को) मॉडेल अंतर्गत ५ मेगावॅट क्षमतेची प्रणाली उभारली जाईल. यामुळे दरवर्षी सुमारे ५५ लाख युनिट वीजनिर्मिती होऊन सुमारे सहा कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे. कार्बन उत्सर्जनात घट झाल्याने हा प्रकल्प पर्यावरणपूरक ठरणार आहे.

याशिवाय, ओपन अ‍ॅक्सेसद्वारे सौर ऊर्जा वापर वाढवत सुमारे ५० मेगावॅट वीजपुरवठा महानगरपालिकेच्या मिळकतींना करण्याचा प्रस्ताव आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) किंवा रेस्को मॉडेलवर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, यामुळे वीज खर्चात लक्षणीय बचत होणार आहे.
शहरातील सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या उपक्रमासोबतच महापालिकेकडूनही ही व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0