PMC Office Timing | महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यालयीन वेळेबाबत महापालिका आयुक्तांचे महत्वाचे आदेश!
Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका प्रशासकीय कार्यालये व विभाग यांचेसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व अधिकारी / कर्मचारी यांना कार्यालयीन कामकाजाची वेळ नेमून दिलेली आहे. याशिवाय ज्या विभागांना फिरतीचे कामकाज, क्षेत्रिय स्तरावरील कामकाज, आरोग्य विभागाकडील वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी, घनकचरा विभागाकडील विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक अशा विविध अधिकारी / कर्मचारी यांच्या कामकाजाच्या वेळा यापूर्वीच निश्चित केलेल्या आहेत. असे असले तरी पुणे महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी हे कार्यालयीन वेळेचे काटेकोरपणे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महत्वाचे आदेश जारी केले आहेत. (Naval Kishor Ram IAS)
१) सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या कामकाजाच्या वेळेचे काटेकोरपणे पालन करावायचे आहे.
२) कार्यालयीन कामामधील नेमून दिलेल्या भोजनाच्या वेळा देखील पाळाव्यात. त्यानुसार भोजनाच्या वेळेनंतर आपापल्या जागेवर उपस्थित राहून कामकाज करावे.
३) कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त फिरतीचे कामकाज असलेल्या, स्थळभेटीचे कामकाज करणाऱ्या, शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबत ते कोठे व किती वाजता स्थळ पाहणी करतात याबाबतच्या नोंदी ठेवण्यात याव्यात. संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या या कामकाजाबाबत त्यांचे नियंत्रण अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर वरचेवर तपासणी करावी.
४) सर्व खातेप्रमुख यांनी अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबतचा दैनंदिन अहवाल खातेनिहाय व संवर्गासह दररोज सायंकाळी महापालिका आयुक्त यांचेकडे सादर करावयाचा आहे.
५) सदर अहवालामध्ये फिरतीचे, स्थळभेटीचे, शिफ्टमध्ये कामकाज करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्या स्थळभेटीबाबतची संक्षिप्त नोंद नमूद करावयची आहे.
६) विलंबाने कार्यालयात येणाऱ्या कर्मचान्यांची विलंबाबाबतची कारणे समजून घेऊन वारंवार उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याची संबंधित खातेप्रमुख यांनी दक्षता घ्यावी.
७) उपरोक्त प्रमाणे कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेबाबत सर्व संबंधित खातेप्रमुख यांनी नियंत्रण ठेवून कार्यवाही करावयाची आहे.

COMMENTS