PMC JE Recruitment | 2023 साली नियुक्त केलेल्या कनिष्ठ अभियंत्यांच्या कागदपत्रांची पुन्हा होणार तपासणी!
| नियुक्त अभियंत्यांना सोमवारी तपासणीला हजर राहण्याचे प्रशासनाचे आदेश
PMC JE Recruitment – (The Karbhari News Service) | पुणे महापालिका प्रशासनाकडून 2022 साली 448 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यात 144 कनिष्ठ अभियंता पदांचा समावेश होता. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 2023 साली एकूण 132 लोकांना नेमणूका देण्यात आल्या होत्या. मात्र अनुभवाच्या कारणावरून काही लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे आता कोर्टाच्या आदेशानुसार सर्वच उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार सोमवारी (ता. 11 मार्च) ला या उमेदवारांना कागदपत्रे घेऊन बोलावण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे महापालिकेतील भरतीवरील निर्बंध उठवल्यानंतर 2022 साली महापालिका प्रशासनाकडून 448 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये वर्ग 2 आणि 3 मधील पदांचा समावेश होता. यामध्ये एकूण 144 कनिष्ठ अभियंता यांचा समावेश होता. त्यात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी 3) | एकूण पदे-135, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (श्रेणी 3) | एकूण पदे-5 आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) (श्रेणी 3) | एकूण पदे – 4 अशा पदांचा समावेश होता. या पदासाठी 3 वर्ष अनुभवाची अट होती. (Pune PMC JE Recruitment)
महापालिका प्रशासनाने सर्व कागदपत्रांची कसून तपासणी करूनच 135 लोकांना पात्र केले होते. मात्र त्यातील काही उमेदवार आले नाहीत. त्यामुळे अशा एकूण 132 लोकांना 2023 साली नेमणुका दिल्या होत्या. मात्र अपात्र झालेले काही उमेदवार अनुभवाचे प्रमाणपत्र खोटे सादर केले असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात गेले होते. यावर कोर्टाने उमेदवारांच्या कागदपत्रांची पुन्हा एकदा तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने या 132 उमेदवारांना कागदपत्रांच्या तपासणीसाठी बोलावले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार या अभियंत्यांना अनुभव पात्रता, शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर कागदपत्रे घेऊन येत्या सोमवारी (11 मार्च) महापालिका नवीन इमारत दुसऱ्या मजल्यावर समिती सभागृहात हजर राहण्यास सांगितले आहे.
—-