PMC JE Recruitment 2026 Exam | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली | 25 जानेवारी ला होणार होती परीक्षा
| महापालिका प्रशासनाची माहिती
PMC Junior Recruitment Bharti Exam – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. पहिल्यांदा यासाठी १ डिसेंबर ला परीक्षा होणार होती. मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्याची तारीख प्रशासना कडून २५ जानेवारी निश्चित करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातील एकूण २० शहरात ही परीक्षा होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र सहित मराठवाडा मधील विविध शहरांचा समावेश आहे. या आधी अर्ज केलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रा बाबत महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार हि परीक्षा २५ जानेवारी ला आयोजित करण्यात आली होती. त्याची सर्व तयारी देखील करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशासना कडून सांगण्यात आले आहे कि, अपरिहार्य कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
प्रशासनाने म्हटले आहे कि, भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुव्यवस्था व उमेदवारांना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून विविध बाबींचा आढावा घेण्यात येत आहे. परीक्षेची नवीन तारीख, वेळ व परीक्षा केंद्रांची माहिती लवकरच निश्चित करून अधिकृत संकेतस्थळ तसेच प्रसारमाध्यमाद्वारे उमेदवारांना कळविण्यात येईल.
उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा, अपप्रचार किंवा अनधिकृत माहितीकडे दुर्लक्ष करावे. तसेच प्रशासनाकडून जाहीर होणाऱ्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. उमेदवारांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महापालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, भरती प्रक्रिया अधिक सक्षम, सुव्यवस्थित व पारदर्शक पद्धतीने राबविण्याची ग्वाही दिली आहे.
सदर परीक्षेबाबत पुढील कार्यवाही किंवा नव्याने निश्चित होणारा परीक्षेचा दिनांक संदर्भातील माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.pmc.gov.in/mr/b/recruitment आणि https://www.pmc.gov.in/en/b/recruitment प्रसिद्ध करण्यात येईल. असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.


COMMENTS