PMC Health Department | किटकजन्य आजारांचा विळखा सैल! | पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला यश
Pune PMC News – (The Karbhari News Service) – २०२५ मध्ये किटकजन्य आजारांची साथ पसरू नये याकरीता आरोग्य विभागाने मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरु केलेल्या मोहिमेला यश आल्याचे दिसत आहे. अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation Health Department)
केसेस २०२४ २०२५
डेंगी 3८२ ८
चिकुन गुनिया ४८३ ८
मलेरिया ५ ०
माहे नोव्हेंबर महिन्यापासून पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य ( किटक प्रतिबंधक ) विभागामार्फत खालील उपाययोजना राबविण्यात आल्या :
१) नोव्हेंबर २०२४ पासून डास उत्पत्ती स्थाने अद्ययावत करून औषध फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली.पुणे महानगरपालिकेमध्ये डास उत्पती शोध मोहिम अंतर्गत ३३४७४ कायम डांस उत्पत्ती स्थाने तर ३७८७४ तात्पुरते डांस उत्पत्ती स्थाने आहेत. गप्पी मासे हे डास अळी भक्षक असल्याने पुणे शहरात १८१ गप्पी मासे पैदास केंद्रे केली असून त्यामधून नागरिकांच्या मागणी तसेच पाणी साठ्यानुसार २५१८ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले.
२) जलपर्णी नियंत्रण होणे करीता महाराष्ट्र शासनाच्या पाट बंधारे विभाग, केंद्र शासनाची कटक मंडळे व पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून जलपर्णी होत असलेल्या भागात जलपर्णी काढून घेणेकामी पाठपुरावा करणायत आला व किटक नाशक औषध फवारणी नियमित पणे करण्यात आली.
३) २५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन व १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त प्रभात फेरी, बनर्स, हस्तपत्रके यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये प्रभावी जनजागरण करण्यात आले. तसेच पालखी मार्गावर जनजागृतीपर फलक लावण्यात आले.
४) कंटेनर सर्व्हेक्षणा दरम्यान डास उत्पत्ती निर्माण करणाऱ्या ८१४ नागरिक / आस्थापनांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने नोटीस दिली असून रक्कम रु. ९६३००/- दंड आकारणी करण्यात आली आहे व सदरची डांस उत्पत्ती नष्ट करण्यात आली.
५) पुणे महानगरपालिकेच्या मागील ३ वर्षाच्या किटकजन्य उद्रेक ग्रस्त भागाचा नकाशाद्वारे मँपिंग करण्यात आली असून त्याप्रमाणे औषध फवारणी मायक्रोप्लन करण्यात आले आहे. ज्या उद्रेक ग्रस्त भागात मागील वर्षी जास्त रुग्ण संख्या आढळून आली तेथे आगामी काळात विशेष लक्ष पुरविण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या तोंडावर संभाव्य पूर नियंत्रण आराखड्यामधील पाणी साचणाऱ्या ठिकाणी औषध फवारणीचे नियोजन तयार आहे.
६) पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये मलेरिया आजाराची शीघ्र तपासणी होणे करीता आशा सेविकांना रक्त नमुने संकलन करणे कामी आशा स्लाईड किट देण्यात येणार असून संकलित रक्तनमुने पुणे महापालिकेच्या कसबा पेठेतील हिवताप क्लिनिक येथे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच मलेरियाच्या दूषित रुग्णांना समूळ उपचार देण्यात येणार आहेत.
७) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (ज) यांनी पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांना पावसाळ्यामध्ये आरोग्य विभागाला सहकार्य करणे कामी आदेश प्रस्तुत केले आहेत.
८) १५ क्षेत्रीय कार्यालय येथील सर्व मलेरिया सर्व्हेलन्स इन्स्पेक्टर यांची बैठक घेऊन पारेषण काळामध्ये करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊन कामकाजाचा नियमित आढावा घेण्यात येत आहे.
९) किटकजन्य आजारग्रस्त रुग्णांची तपासणी करताना डेंग्यू आजाराच्या निश्चित निदानासाठी खाजगी रुग्णालय / प्रयोग शाळा व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी NS१ ELISA व MAC ELISA या तपासणीसाठी प्रत्येकी ६०० रु.पेक्षा जास्त शुल्क आकारणी करण्यात येऊ नये तसेच किटक जन्य आजारग्रस्त रुग्णांची माहिती त्वरीत महापालिकेच्या आरोग्य विभागास देण्यात यावी याकरीता सर्व खाजगी रुग्णालये, प्रयोग शाळा यांना पत्र देण्यात आले असून रुग्णांची माहिती प्राप्त होताच रुग्णांचा परिसरात त्रिस्तरीय उपाययोजना ( अळीनाशक कार्यक्रम, किटक नाशक औषध फवारणी व जनजागरण ) राबविण्यात येणार आहेत.
मागील ३ वर्षाच्या किटकजन्य आजारग्रस्त रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता मलेरिया रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याने किटक प्रतिबंधक विभाग नियोजनबद्ध काम करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु डेंगी व चिकुनगुनिया पसरविणारा एडीस इजिप्ती या डासांची पैदास घरातील / सोसायटी मधील पाणीसाठ्यामध्ये होत असल्याने नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याचे व नागरिकांनी पूर्ण बाह्याचे कपडे परिधान करण्याचे, डास प्रतिबंधक मलम यांचा वापर करण्याचे व दिवसा विश्राम करणाऱ्या नागरिकांनी मच्छर दाणीचा वापर करण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम.जे.प्रदीप चंद्रेन यांनी केले आहे.
COMMENTS