PMC Election Voter List | मतदार यादीतील दुबार नावे वगळा | अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठावू
– माजी आमदार मोहन जोशी
Mohan Joshi Pune – (The Karbhari News Service) – महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीतील सुमारे ३ लाख मतदारांची दुबार नोंदली गेलेली नावे मतदार यादीतून त्वरित वगळावीत, अन्यथा लोकशाही मार्गाने न्यायालयात जावू, असा इशारा माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महापालिकेला दिला आहे. (Pune Corporation Election 2025)
महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. मतदारांची एकूण संख्या ३५लाख४१हजार४६९ आहे. त्यात ३लाख४४६ नावे दुबार आहेत. ही दुबार नावे आलीच कशी? कोण अधिकारी यासाठी जबाबदार आहेत? याची चौकशी व्हायला हवी. येत्या ५ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यापूर्वी दुबार नावे वगळली जावीत, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मतदार यादी जाहीर करताना प्रशासनाने आठ दिवसांची मुदत वाढवून घेतली होती. तरी हा घोळ झाला कसा? असा सवाल जोशी यांनी केला आहे.
गेल्या वर्षभरात महाराष्ट्र, हरियाणा येथे झालेल्या विधानसभेच्या निवडणुका व्होट चोरी, दुबार मतदान अशामुळे वादग्रस्त झाल्या आहेत. मतदार वगळण्याचेही प्रकार झाले आहेत. या कारणांनी निवडणुकीतील निकालाबाबत मतदारांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुका पारदर्शी वातावरणात व्हायला हव्यात, अशी काँग्रेसची मागणी आहे. त्यादृष्टीने यादी तयार करताना भौगोलिक हद्दीचे घोळ मिटविणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळणे ही कामे व्हायला हवीत, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.
पुणे महापालिकेच्या प्रभाग रचना करताना भाजपच्या नेत्यांनी हस्तक्षेप केले, असे आक्षेप आहेतच. निवडणुका जिंकण्यासाठी सत्तेचा गैरवापर करून भाजप कोणत्याही थराला जावू शकतो, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे.

COMMENTS