PMC Election 2025 | प्रारूप प्रभाग रचना : निमित्त महापालिका निवडणूक; वेध मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचे!
PMC Ward Structure – (The Karbhari News Service) – पुणे आणि राज्यातील इतर महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र या रचनेतून ना सत्ताधारी समाधानी दिसले ना विरोधक. सर्वांनीच नाराजी व्यक्त केली आहे. असे असले तरी सत्ताधारी लोकांनी आपले वर्चस्व गाजवत रचना केली, असे म्हणायला वाव आहे. कारण यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या गेल्या आहेत, हे मात्र यातून दिसून आले. (Pune Municipal Corporation Election 2025)
पुणे महापालिका प्रभाग रचना वर विरोधक लोकांनी वारेमाप आरोप केले. त्यांच्या आरोपानुसार ही तर लोकशाहीची थट्टा आहे. काही प्रभागात मतदारसंख्या १,१५,००० पर्यंत, तर काही प्रभागात फक्त ७५,०००. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या “समान मतदार” या अटीची उघडपणे पायमल्ली करत असमानता दिसून अली. नैसर्गिक सीमा व सलगता वाऱ्यावर गेली. नद्या, रस्ते, रेल्वे लाईन यांचा विचार न करता कृत्रिम विभागणी केली. प्रतिनिधित्वातील असमानता म्हणजे एका प्रभागात ५ नगरसेवक, इतर सर्व ठिकाणी ४. हे थेट “एक मतदार, एक मत, एक प्रतिनिधी” या लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वाशी विसंगत आणि बेकायदा आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत मसुदा रचनेत राज्य निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले असे आरोप केले गेले. हे सीमांकन म्हणजे लोकशाही नाही, तर राजकीय गणित आणि फायद्यासाठी केलेली उघड उघड हेराफेरी आहे. असा थेट आरोप विरोधकांनी केला.
विरोधकांची ही दशा तर सत्ताधारी पक्ष आणि महायुती मधील काही प्रतिनिधी देखील या रचनेवर नाखूष दिसून आले. कुणाला तीन चा प्रभाग हवा होता. तर कुणी म्हणाले की आमच्या प्रभागाची कशाही तऱ्हेने तोडफोड केली. आम्ही जिथे काम केले तो भाग तोडला आणि दुसराच भाग जोडला. तर काही म्हणाले, आमचे भाग इतके दूर ठेवले की आता आम्ही एवढ्या दूर जाऊन नागरिकांची विकास कामे कशी करणार? अशा एक ना अनेक तक्रारी. त्यामुळे यावर कुणी समाधानी आहे, असे म्हणता येणार नाही. किंबहुना प्रभाग रचना कुणाच्या मनासारखी होत नसते, असे म्हणायला मात्र चांगला वाव आहे.
विरोधक आणि सत्ताधारी या रचनेवर खुश नसले तरी सत्तेतील लोकांचे वर्चस्व मात्र या प्रभाग रचनेवर दिसून आले आहे. कारण महापालिका प्रशासनाने देखील काही निकषाना बगल दिलेली दिसते. प्रत्येक प्रभागात १०-१५ टक्के बदल दिसून येत आहे. मात्र यात दूरदृष्टी ठेवली गेलेली दिसते. कारण भाजपच्या किंवा महायुती मधील मोजक्याच लोकांना सोयीची अशी रचना अशी दिसून आली. हे मोजके लोक कुठले? जे लोक सहजपणे निवडणूक जिंकू शकतात त्यांना रचना सोयीची केलेली दिसून आली. कारण रचना करण्याआधी सर्वांचा सर्वे केला गेला होता. यात जे लोकप्रतिनिधी बळकट दिसून आले, त्यांच्यासाठी मात्र झुकते माप दिले गेले. शिवाय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक देखील ही रचना करताना डोळ्यासमोर ठेवली गेलेली दिसली. आगामी काळात पुण्यात दोन महापालिका होऊ शकतात. ही सर्व गणिते लक्षात ठेऊन ही प्रभाग रचना केली गेली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

COMMENTS