PMC Deep Clean Drive | डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून एकूण ९२ टन ओला कचरा, १३३ टन सुका कचरा, ८३७ टन राडारोडा व ७७ टन पालापाचोळा संकलित | महापालिका प्रशासनाचे सकारात्मक पाऊल
| डीप क्लिन ड्राईव्ह दर महिन्यातून एकदा होणे आवश्यक असल्याची क्षेत्रिय कार्यालयांकडून मागणी
PMC Solid Waste Management Department – (The Karbhari News Service) – स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सूक्ष्म/खोलवर स्वच्छता मोहीमेचे (deep cleaning drive) आयोजन करण्यात आले होते. डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून एकूण ९२ टन ओला कचरा, १३३ टन सुका कचरा, ८३७ टन राडारोडा व ७७ टन पालापाचोळा संकलित करण्यात आला. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. (Sandip Kadam PMC)
महापालिका आयुक्त यांचे संकल्पनेतून व अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) यांनी दिलेल्या आदेशांनुसार स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत ९डिसेंबर रोजीपासून १४ डिसेंबर पर्यंत परिमंडळ १ मधील क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दैनंदिन स्वरूपात सूक्ष्म/खोलवर स्वच्छता मोहिमेचे (deep cleaning drive) प्रायोगिक तत्वावर आयोजन करण्यात आले. त्यानंतर दिनांक १६ रोजीपासून २७ रोजीपर्यंत परिमंडळ २ ते ५ मधील सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत डीप क्लिन ड्राईव्ह घेण्यात आला. यामध्ये क्षेत्रिय कार्यालयाकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाबरोबरच अतिक्रमण विभाग, आकाशचिन्ह व परवाना विभाग, किटक प्रतिबंधक विभाग, उद्यान विभाग, ड्रेनेज विभाग, पाणीपुरवठा विभाग, पथ विभाग, विद्युत विभाग, शिक्षण विभाग, मोटार वाहन विभाग, बांधकाम व परवानगी विभाग अशा सर्व विभागांनी सक्रीय सहभाग घेतला.
९ डिसेंबर ते दिनांक २७डिसेंबर या कालावधीमध्ये १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत झालेल्या डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून एकूण ९२ टन ओला कचरा, १३३ टन सुका कचरा,
८३७ टन राडारोडा व ७७ टन पालापाचोळा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमे दरम्यान शहरात सार्वजनिक ठिकाणी केरकचरा, राडारोडा टाकून अस्वच्छता करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा जाळणे, उघड्यावर शौच/लघवी करणे, बल्क वेस्ट जनरेटर्समधील प्रक्रिया प्रकल्प बंद असणे, प्लास्टिकचा वापर करणे, अशा विविध बाबींच्या अनुषंगाने दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ६६१ केसेस व ५,५९,३२०/- इतका दंड वसूल करण्यात आला.
१५ क्षेत्रियकार्यालयांतर्गत एकूण १४७ ठिकाणच्या शौचालयांचे यांत्रिक पद्धतीने डीप क्लिनिंग करण्यात आले. अतिक्रमण विभागामार्फत विविध ठिकाणी अनधिकृतपणे टाकलेले स्टॉल्स, शेड्स, हातगाडी, पथारीवाले, दीर्घकाळापासून बंद असलेली वहाने इत्यादींवर कारवाई करण्यात आली. यामध्ये अनधिकृत असलेल्या एकूण ५९ हातगाडी, ६७ स्टॉल्स, १०० लोखंडी काउंटर, १०९ पथारीवाले इत्यादींवर अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात आली. दीर्घकाळापासून बंद असलेली ४७ चारचाकी वाहने व ५० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. तसेच एकूण १०४७ इतर ठिकाणे जसे कि, कच्चे-पक्के शेड्स, अनधिकृत झोपड्या, स्थिर फलक, अनधिकृत सिलेंडर, फायबर खुर्ची, लोखंडी टेबल/कॉट, लोखंडी फ्रेम/बॉक्स, पत्रा शेड इ. ठिकाणी देखील अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात आली.
आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत एकूण १३२९ स्टिकर्स/पोस्टर्स, ९४८ फ्लेक्स/बॅनर्स,६७ ग्लोस बोर्ड व २१४ इतर अनधिकृत ठिकाणी कारवाई करण्यात आली. कीटक
प्रतिबंधक विभागामार्फत १५ शहरातील विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार कीटकनाशक औषध फवारणी करण्यात आली. तसेच साथीच्या रोगांबाबत जनजागृती करणे, माहिती पत्रक व स्टिकर्सचे वाटप करणे, कंटेनर सर्वेक्षण करणे इ. कामकाज कीटक प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात आले. घरांचे सर्वेक्षण करून एकूण २७ डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्यात आली.
उद्यान विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी असलेल्या झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करून साफसफाई करण्यात आली. एकूण ९०० झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करून अंदाजे ३७ टन पालापाचोळा व फांद्या संकलित करण्यात आल्या.
पथ विभागामार्फत १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार एकूण ४१६९ स्के.मी. रस्त्यांची व खड्ड्यांची डागडुजी व एकूण १४० स्के.मी. फुटपाथ दुरुस्ती करण्यात आली. ड्रेनेज विभागामार्फत एकूण ३०७ चेंबर्सची स्वच्छता करण्यात आली. तसेच आवश्यक त्या ठिकाणी मेनहोल कव्हर उचलणे, पावसाळी चेंबर्स उचलणे, चेंबर्सचे झाकण बदलणे, ब्लॉक दुरुस्ती करणे अशी विविध कामे ड्रेनेज विभागामार्फत करण्यात आली.
विद्युत विभागामार्फत विविध ठिकाणचे एकूण ३,९७,२३० मीटरचे नेट केबल कट करून २८१ ठिकाणी स्ट्रीट लाईट दुरुस्ती करण्यात आली. बांधकाम परवानगी विभागामार्फत अनधिकृत असलेले कच्चे-पक्के बांधकाम, शेड्स, फ्रंट मार्जिन पत्रा शेड्स अशा एकूण १,७०,९६५ स्के. फुट अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आल्या व ३० ठिकाणी नोटीसेस देखील देण्यात आल्या.
क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध शाळांचे व महाविद्यालयांचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करून सार्वजनिक स्वच्छता, कचरा वर्गीकरणाचे महत्व, प्लास्टिक बंदी अशा विविध विषयांवर जनजागृती करण्याचे काम केले. या संपूर्ण डीप क्लिन ड्राईव्हकरीता आवश्यक असणारी कचरा संकलन व वाहतुकीचे वाहने मोटार वाहन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली.
या कालावधीमध्ये १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या या डीप क्लिन ड्राईव्हमध्ये क्षेत्रिय कार्यालयाकडील पर्यवेक्षकीय अधिकारी, सफाई सेवक यांचे समवेत स्वच्छ सर्वेक्षणकरीताचे ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर्स, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, खाजगी संस्था, शाळा / महाविद्यालयांचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी अशा एकूण १०,५३० सहभागींनी आपला सहभाग नोंदविला. विविध विभागांनी एकत्र येऊन केलेल्या कामकाजामुळे शहराची सर्वांगीण स्वच्छता होत असून या प्रकारचे डीप क्लिन ड्राईव्ह दर महिन्यातून एकदा होणे आवश्यक असल्याची मागणी सर्व क्षेत्रिय कार्यालयांकडून केली जात आहे.
डीप क्लीन ड्राईव्ह मुळे शहरातील स्वच्छतेत जाणवण्या इतका बदल दिसून येत आहे. सर्वच बाबतीत शहर स्वच्छ दिसू लागले आहे. अशा मोहिमा वारंवार घेणे आवश्यक आहे. याबाबत प्रशासनाची तयारी आहे. दरम्यान या मोहिमेमुळे शहरातील नागरिकांचा देखील सकारात्मक प्रतिसाद दिसून आला आहे. शिवाय कर्मचारी देखील काम करण्यास उत्सुक दिसून येत आहेत. आपले शहर स्वच्छ असावे, ही जाणीव सर्वांमध्ये निर्माण झाली आहे.
- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा विभाग.
COMMENTS