PMC Contract Employees | कंत्राटी कामगारांना कायदेशीर हक्का पासून वंचित ठेवणार नाही | आयुक्त नवल किशोर राम
Pune PMC News – (The Karbhari News Service) – कंत्राटी कामगारांचा पगार वेळेवर होत नाही, पगार स्लिप मिळत नाही, बोनस मिळत नाही, कायद्याप्रमाणे रजा मिळत नाही, राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्यांचा पगार कायद्याप्रमाणे मिळत नाही, ESI कार्ड मिळत नाही, P.F. किती जमा झाला हे समजत नाही. या संदर्भामध्ये मनपा प्रशासन मा. आयुक्त व संबंधीत अधिकारी यांना वारंवार निवेदने देऊन प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रीय मजदूर संघाने माहिती दिली आहे. तरी या संदर्भात मनपा प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. म्हणूनच कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाकडून मंगळवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मोर्चा राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व कामगार नेते सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. (Naval Kishore Ram IAS)
पुणे मनपाचा गाडा कंत्राटी कामगारांवर अवलंबून आहे परंतु सातत्याने कंत्राटी कामगारांच्या हक्क व अधिकारांकाकडे सातत्याने निवेदन देऊन सुध्दा मनपा प्रशासन दुर्लक्ष करते त्यामुळे हा मोर्चा काढावा लागत आहे अशी खंत कामगार नेते सुनील शिंदे यांनी केली. पुढे ते म्हणाले की कायम कामगारांना बोनस ऍक्ट लागू नाही पण त्यांना बोनस मिळतो परंतु कंत्राटी कामगारांना बोनस ऍक्ट लागू असून सुध्दा बोनस मिळत नाही हा विरोधाभास फक्त पुणे महानगरपालिकेतच दिसतो.
या मोर्चाचा शेवट पुणे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वार येथे करण्यात आला व शेवटी पुणे आयुक्त नवल किशोर राम यांच्या दालनात कंत्राटी कामगार प्रश्ना संदर्भात बैठक झाली. आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने सर्व प्रश्न ऐकून घेतले व संबंधित प्रश्नाबाबत विभागाचे अधिकारी, कामगार उपायुक्त, ठेकदार, प्रॉव्हिडन्स फंडचे अधिकारी, कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक होईल याबाबत कळविले.

तसेच कंत्राटी कामगारांना कायदेशीर हक्का पासून वंचित ठेवणार नाही असे आश्वासन पुणे मनपाचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
या मोर्चात संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सरचिटणीस एस के पळसे, मनपाचे स्मशानभूमी, सुरक्षारक्षक, वेहिकल डेपो, पाणीपुरवठा, कंत्राटी कर्मचारी, राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान अंतर्गत काम करणारे कर्मचारी सहभागी झाले होते तसेच मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी संघटनेचे माथाडी कामगार प्रतिनिधी, पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

COMMENTS