PMC Building Parking | महापालिका नवीन इमारतीतील पार्किंग व्यवस्था नवीन सभासदांसाठी राखीव | प्रशासनाच्या प्रायोगिक तत्वाने कर्मचारी मात्र हैराण!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका प्रशासनाने महापालिका भवनातील नवीन इमारतीतील पार्किंग व्यवस्था ही पूर्णपणे नवीन सभासदांच्या चार चाकी आणि दुचाकींसाठी राखीव करण्याचा निर्णय घेतला आहे. याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र याची कुठलीही पूर्वसूचना देण्यात न आल्याने सद्यस्थितीत तिथे गाड्या लावणाऱ्या महापालिका कर्मचारी आणि नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
नुकतीच पुणे महापालिका निवडणूक पार पडली आहे. महापालिका सभागृहात आता १६५ हून अधिक नगरसेवक येणार आहेत. सोबतच त्यांचे कार्यकर्ते देखील असणार आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पार्किंग नियोजनाबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नवीन इमारतीतील संपूर्ण पार्किंग व्यवस्था ही नगरसेवकांसाठी असेल, असे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. (PMC Security Department)
सद्यस्थितीत नवीन इमारतीतील पार्किंग मध्ये महापालिका कर्मचारी, नागरिक, ठेकेदार, असे गाड्या लावत आहेत. आता ही व्यवस्था बदलल्याने सर्वात जास्त गैरसोय महापालिका कर्मचाऱ्यांची झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या गाड्यांसाठी प्रशासनाने महापालिका भवन शेजारील गॅरेज मध्ये आणि पीएमपी बस स्टँड मध्ये व्यवस्था केली. मात्र ते देखील तत्काळ भरून गेले. त्यामुळे सकाळीच कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली. त्यातच आज पुणे ग्रैंड टूर चा शेवटचा टप्पा असल्याने त्या गैरसोयीत भर पडली. प्रशासनाने आम्हाला अगोदर सूचना द्यायला हवी होती. या आधी देखील १६२ नगरसेवक असताना कधी गैरसोय झाली नाही. अशा तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या.

टफळे गॅरेज नवीन पार्किंग
दरम्यान याबाबत महापालिका प्रकल्प विभाग आणि सुरक्षा विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. प्रशासनाकडून सांगण्यात आले की, महापालिका कर्मचाऱ्यांच्या पार्किंग ची व्यवस्था आता जुन्या इमारतीतील पार्किंग मध्ये, तसेच मनपा भवन शेजारील गॅरेज आणि पीएमपी बस स्टँड मध्ये करण्यात आली आहे. आगामी काळात एलबीटी कार्यालय आणि अमराळे दवाखान्याच्या जागेवर ५ मजली इमारत उभारण्यात येऊन तिथे पार्किंग ची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी महापालिका आपल्या मालकीच्या गाड्या देखील घेणार आहे.
—-
नवीन इमारतीतील पार्किंग ची व्यवस्था बदलून आम्ही इतर ठिकाणी जागा देण्याचे नियोजन करत आहोत. सद्यस्थितीत महापालिका जुनी इमारत, मनपा भवन शेजारील गॅरेज आणि पीएमपी बस स्टँड च्या ठिकाणी व्यवस्था केली आहे. आगामी काळात ५ मजली इमारत बांधण्याचे नियोजन असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
– दिनकर गोजारे, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग.
—-
पार्किंग व्यवस्थेबाबत प्रायोगिक तत्त्वावर आम्ही चाचपणी सुरू केली आहे. कारण नवीन सभासद आल्यानंतर गाड्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे आम्ही नियोजन करत आहोत. सुरुवातीला कर्मचाऱ्यांना त्रास होणार आहे. मात्र आम्ही प्रत्येकासाठी जागा निश्चित करत आहोत. नवीन इमारतीत फक्त नगरसेवकांच्याच गाड्यांसाठी जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना भवनात जागा देण्यात येणार आहे. तसेच नागरिक, ठेकेदार, आर्किटेक्ट यांना मनपा भवन च्या बाहेर गाड्या लावाव्या लागणार आहेत. कर्मचाऱ्यांनी आता मेट्रो, सायकल असे पर्याय वापरावेत. तसेच कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी महापालिका मालकीच्या गाड्या घेणार आहे.
– राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी.
—
सद्यस्थितीत आम्ही पूर्वी पदाधिकाऱ्यांना ज्या राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या, त्या जागेवरील गाड्या हटवल्या आहेत. पुढील आठवड्यात आम्ही योग्य नियोजन करून सर्वांना सोयीचे ठरेल, अशी व्यवस्था करणार आहोत.
– डॉ रमेश शेलार, मुख्य सुरक्षा अधिकारी.

COMMENTS