PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण  | जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे केले उद्घाटन

Homeadministrative

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण | जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे केले उद्घाटन

Ganesh Kumar Mule Sep 29, 2024 9:21 PM

Maharashtra MLC Election | विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी
Maharashtra Cabinet Decisions | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झालेले निर्णय जाणून घ्या!
Davos | Maharashtra News | दावोसमध्ये महाराष्ट्राने केले ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

| जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे केले उद्घाटन

| बिडकीन औद्योगिक क्षेत्राचे केले लोकार्पण

| सोलापूर विमानतळाचे केले उद्घाटन

| भिडेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी

 

 

Prime Minister Narendra Modi – (The Karbhari News Service) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण झाले.

दोन दिवसांपूर्वी खराब हवामानामुळे पुण्यातील त्यांचा कार्यक्रम रद्द झाल्याची आठवण पंतप्रधानांनी आपल्या करून दिली आणि आजच्या आभासी कार्यक्रमाचे श्रेय तंत्रज्ञानाला दिले. थोर व्यक्तींची ही प्रेरणादायी भूमी महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय पाहत आहे, असे ते म्हणाले.जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे उद्घाटन आणि पुणे मेट्रो पहिल्या टप्प्याच्या स्वारगेट-कात्रज विस्ताराची पायाभरणी या दोन कार्यक्रमांचा उल्लेखही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला. भिडेवाडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या कन्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणीही करत असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील जीवनमान अधिक सुखकर करण्याच्या दिशेने झपाट्याने होत असलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

सोलापूर शहराशी थेट हवाई संपर्कासाठी सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करताना पंतप्रधान म्हणाले, “भगवान विठ्ठलाच्या भक्तांनाही आज विशेष भेट मिळाली आहे”. सध्याच्या विमानतळाचे अद्ययावतीकरण झाल्यानंतर टर्मिनलची क्षमता वाढली असून प्रवाशांसाठी नवीन सेवासुविधा उपलब्ध झाल्या आहेत, त्याचा लाभ भगवान विठ्ठलाच्या भक्तांना मिळत असल्याचे ते म्हणाले. विमानतळामुळे व्यवसाय, उद्योग आणि पर्यटनाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. या विकास प्रकल्पांसाठी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदनही केले.

“आज महाराष्ट्राला नवीन संकल्पांसह मोठ्या उद्दिष्टांची गरज आहे”, असे सांगताना त्यांनी पुण्यासारख्या शहरांना प्रगती आणि नागरी विकासाची केंद्रे बनवण्याच्या गरजेवर भर दिला. पुण्याची प्रगती आणि वाढत्या लोकसंख्येच्या पायाभूत सुविधांवरचा ताण याबाबत बोलताना विकास आणि क्षमता वाढवण्यासाठी आता पावले उचलण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सध्याचे राज्य सरकार पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरणासाठी आणि शहराचा विस्तार करताना दळणवळणाला चालना देण्यासाठी काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पुणे मेट्रोबद्दल 2008 मध्ये चर्चा सुरू झाली, परंतु आपल्या सरकारने जलद निर्णय घेतल्यानंतर 2016 मध्ये त्याची पायाभरणी झाली. त्यामुळे आज पुणे मेट्रोची व्याप्ती आणि विस्तार वाढत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आजच्या प्रकल्पांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, एकीकडे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे उद्घाटन झाले आहे, तर दुसरीकडे स्वारगेट ते कात्रज मार्गाची पायाभरणीही झाली आहे. या वर्षी मार्चमध्ये रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो सेवेचे उद्घाटन केल्याचा उल्लेख त्यांनी केला. वेगवान निर्णय घेऊन अडथळे दूर केल्यामुळे 2016 पासून आतापर्यंत पुणे मेट्रोचा विस्तार झाल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले. सध्याच्या सरकारने पुण्यात मेट्रोचे आधुनिक जाळे तयार केले आहे, तर मागील सरकारला आठ वर्षांत मेट्रोचा जेमतेम एक खांब उभा करता आला याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी विकासाभिमुख प्रशासनाचे महत्त्व विशद करतानाच या सातत्यात कोणताही अडथळा आल्यास राज्याचे मोठे नुकसान होते असे त्यांनी सांगितले. दुहेरी इंजिन सरकार सत्तेत येण्यापूर्वी मेट्रोच्या उपक्रमापासून ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनपर्यंत तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे सिंचन प्रकल्प अशा विविध रखडलेल्या प्रकल्पांची उदाहरणे त्यांनी दिली.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात प्रस्तावित ऑरिक सिटीचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या बिडकीन औद्योगिक क्षेत्राबद्दल पंतप्रधानांनी भाष्य केले. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरवर असलेल्या या प्रकल्पात अडसर आले होते, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दुहेरी इंजिन सरकारमुळे त्याला नवसंजीवनी मिळाली असे ते म्हणाले. बिडकीन औद्योगिक क्षेत्र देशाला समर्पित केल्याचे त्यांनी जाहीर केले. या क्षेत्राकडे लक्षणीय गुंतवणूक आणून रोजगाराच्या संधी तयार करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. “बिडकीन औद्योगिक क्षेत्र 8,000 एकरावर पसरलेले असून या क्षेत्राच्या विकासामुळे हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येईल आणि हजारों युवकांना रोजगार मिळेल” असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती ही महाराष्ट्रातील युवावर्गासाठी आज मोठी शक्ती बनत आहे, यावर त्यांनी भर दिला. आधुनिकीकरण देशाच्या मूलभूत तत्वांवर आधारित असले पाहिजे आणि भारत आपला समृद्ध वारसा पुढे नेत आधुनिक आणि विकसित होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. भविष्याच्या दृष्टीने सज्ज अशा पायाभूत सेवासुविधा आणि विकासाचे लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि ज्यावेळी समाजातील प्रत्येक घटक विकासाच्या यात्रेत सहभागी होईल तेव्हा ते प्रत्यक्षात साकार होऊ शकते हे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी सामाजिक परिवर्तनातील महिलांच्या भूमिकेवर भर दिला. त्यांनी महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाच्या वारशाला विशेषतः पहिली मुलींची शाळा सुरु करून महिला साक्षरतेची चळवळ उभारणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांना अभिवादन केले. पंतप्रधानांनी सावित्रीबाई फुले स्मारकाची पायाभरणी केली, यामध्ये कौशल्य विकास केंद्र, वाचनालय आणि इतर आवश्यक सुविधा असतील. हे स्मारक सामाजिक सुधारणा चळवळीला एक चिरस्मरणीय श्रद्धांजली ठरेल आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात महिलांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असे विशेषतः शिक्षण घेण्यात अनेक समस्या येत असत असे सांगून शिक्षणाची कवाडे महिलांसाठी उघडणाऱ्या सावित्रीबाई फुलेंसारख्या दृष्ट्या व्यक्तींची त्यांनी प्रशंसा केली. स्वातंत्र्य मिळल्यानंतर देखील भूतकाळातील मानसिकता बदलण्यासाठी देशाने संघर्ष केला मात्र याआधीच्या सरकारांनी अनेक क्षेत्रांमध्ये महिलांच्या प्रवेशावर निर्बंध आणले, असे पंतप्रधान म्हणाले. शाळांमध्ये शौचालयासारख्या मूलभूत पायाभूत सुविधांच्या अभावामुळे मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण वाढत गेले, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या सरकारने अनेक कालबाह्य पद्धतींचे उच्चाटन केले असून यामध्ये मुलींचा सैनिकी शाळांमध्ये प्रवेश आणि सशस्त्र दलांमध्ये महिलांची भूमिका यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. गर्भवती महिलांना त्यांचे काम सोडावे लागते या समस्येकडे देखील त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाच्या उल्लेखनीय परिणामांना अधोरेखित केले आणि उघड्यावर शौचास जाण्याच्या त्रासातून मुक्ती मिळाल्यामुळे मुली आणि महिला यांच्या सर्वाधिक लाभार्थी आहेत, शाळेतील स्वच्छतेच्या सुधारणांमुळे मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले. महिलांच्या सुरक्षेसाठी केलेले कठोर कायदे आणि भारताच्या लोकशाही प्रक्रियेत महिलांचे नेतृत्व सुनिश्चित करणाऱ्या नारी शक्ती अधिनियमाचा त्यांनी उल्लेख केला. “जेव्हा प्रत्येक क्षेत्राची कवाडे मुलींसाठी खुली होतात, तेव्हाच राष्ट्राच्या प्रगतीचे द्वार खुले होते” असे त्यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले स्मारक या संकल्पांना आणि महिला सक्षमीकरणाच्या मोहिमेला आणखी ऊर्जा देईल, असा विश्वास व्यक्त केला.

देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे असा आपला विश्वास असल्याचे सांगून “विकसित महाराष्ट्र, विकसित भारत” हे उद्दिष्ट आपण सर्व मिळून साध्य करू” असे ते आपल्या भाषणाचा समारोप करताना म्हणाले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे उद्घाटन झाले. त्यामुळे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प (टप्पा-1) पूर्ण होत आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गाचा खर्च सुमारे 1,810 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 2,955 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात येणाऱ्या पुणे मेट्रो टप्पा-1 च्या स्वारगेट-कात्रज विस्ताराची पायाभरणी करण्यात आली. सुमारे 5.46 किमी लांबीचा हा दक्षिणेकडील विस्तार मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या तीन स्थानकांसह पूर्णपणे भूमिगत आहे.

सरकारच्या राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेस 20 किमी अंतरावर 7,855 एकर क्षेत्रावर पसरलेले बिडकीन औद्योगिक क्षेत्र पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत विकसित केलेल्या प्रकल्पात मराठवाडा विभागातील एक आर्थिक केंद्र म्हणून यात प्रचंड क्षमता आहे. एकूण 6,400 कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजूरी दिली असून तो तीन टप्प्यांमध्ये विकसित होणार आहे.

पंतप्रधानांनी सोलापूर विमानतळाचेही उद्घाटन केले. या विमानतळामुळे संपर्क सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होतील आणि सोलापुरात जाणारे पर्यटक, तिथले व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांसाठी ते अधिक सोयीचे होईल. सुमारे 4.1 लाख प्रवाशांना (वार्षिक) सेवा देण्यासाठी सोलापूरच्या विद्यमान टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. भिडेवाडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या कन्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0