पीएफच्या व्याजदरात घट! |
निर्णयाचा सुमारे पाच कोटी ग्राहकांवर परिणाम होणार
केंद्र सरकारने 2021-22 या वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (EPFO) 8.1 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर नोकरदार वर्गाला मोठा झटका बसला आहे. सध्या केंद्राकडून भविष्य निर्वाह निधीच्या बचतीवर 8.5 टक्के व्याज देण्यात येत होते. परंतु, आता यामध्ये घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार दशकांहून अधिक काळातील हा सर्वात कमी व्याजदर असून, या निर्णयाचा सुमारे पाच कोटी ग्राहकांवर परिणाम होणार आहे.
मार्चच्या सुरुवातीला, EPFO ने 2021-22 साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज 8.1 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला होता. 2020-21 मध्ये हा दर 8.5 टक्के होता. शुक्रवारी जारी केलेल्या EPFO आदेशानुसार, कामगार आणि रोजगार मंत्रालयाने EPF योजनेच्या प्रत्येक सदस्यासाठी 2021-22 साठी 8.1 टक्के व्याज देण्याचे निश्चित केले होते. तसेच हा प्रस्ताव कामगार मंत्रालयातर्फे अर्थ मंत्रालयाकडे परवानगीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला केंद्राकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार EPFO कडून आर्थिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या व्याजदरानुसार कर्मचाऱ्यांच्या बचतीवर व्याज जमा करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान, याआधी सर्वात कमी म्हणजेच 8 टक्के व्याजदर 1977-78 मध्ये देण्यात आले होते. त्यानंतर आता बचतीवर केवळ 8.1 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2015-16 मध्ये व्याजदर 8.8 टक्क्यांनी किंचित जास्त होता. 2013-14 तसेच 2014-15 मध्ये 8.75 टक्के व्याजदर देण्यात आले होते. जे 2012-13 च्या 8.5 टक्क्यांपेक्षा काही प्रमाणात अधिक होते. तर, हेच व्याज 2011-12 मध्ये 8.25 टक्के इतके होते.
COMMENTS