दिवाळीत मंडप, रनिंग मंडप अथवा कमानी उभारण्यास परवानग्या दिल्या जाणार नाहीत
| अतिक्रमण विभागाचे आदेश
पुणे | दिवाळी सणाचे कालावधीत रस्ता, पदपथांलगतच्या खाजगी मिळकतीमधील दुकानदारांकडून मंडप, रनिंग मंडप अथवा कमानी उभारण्याकरिता मागणी होत असते. अशा परवानगीनुसार देण्यात आलेल्या मंडप, रनिंग मंडप अथवा कमानी उभारल्यामुळे रस्ता, पदपथांवर अनधिकृतपणे खड्डे घेतले जातात. तसेच रस्ता, पदपथांवरील मंडपामध्ये अनधिकृतपणे फटाके, दिवाळी फराळ व इतर विक्री साहित्य ठेवून नागरिकांच्या व वाहनांच्या रहदारीस अडथळे निर्माण केले जातात. त्यामुळे यावर्षांपासून रस्ता, पदपथांलगतच्या खाजगी मिळकतीमधील दुकानदारांना मंडप, रनिंग मंडप अथवा कमानी उभारण्यास कोणत्याही परवानग्या दिल्या जाऊ नयेत. असे आदेश अतिक्रमण विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
अतिक्रमण विभागाच्या आदेशानुसार ज्या व्यावसायिकांनी मागीलवर्षी अशा परवानग्या घेतल्या असतील त्यांना अथवा यावर्षी नविन व्यावसायिकांना वरीलकामी वाहतूक पोलीस विभागाकडून ना-हरकत दाखले देण्यात आलेले असले तरी अशा व्यावसायिकांना त्यांनी मागणी केलेल्या अर्जास लेखी पत्रान्वये परवानग्या न देणेबाबत स्पष्ट नकार कळविण्यात यावा. तसेच जे व्यावसायिक रस्ता, पदपथांवर अनधिकृतपणे दिवाळी सणानिमित्त फटाके, दिवाळी फराळ व इतर विक्री साहित्य ठेवून व्यवसाय करतील अथवा त्याकरिता मंडप, रनिंग मंडप अथवा कमानी व जाहिरात फलक उभारतील अशा सर्व व्यावसायिकांवर त्वरित कारवाया करून रस्ते, पदपथ नागरिकांच्या व वाहनांच्या रहदारीस अतिक्रमणमुक्त ठेवावेत. परंतु हंगामी व्यवसाय करणाऱ्या (फटाके विक्री वगळून) छोटे पथारी व्यावसायिकांना नियमानुसार पोलीस वाहतूक शाखेकडील ना-हरकत दाखला घेवून हंगामी परवानगीची मागणी केल्यास मागणी केलेल्या जागेची नागरिकांच्या व वाहनांच्या रहदारीस अडथळे निर्माण नाहीत याबाबतची खात्री करून नंतरच संबंधित महापालिका सहाय्यक आयुक्त यांचे स्वाक्षरीने अंतिम मान्यतेसाठी व नियमानुसार दैनंदिन परवाना शुल्क भरणेकरिता मुख्य अतिक्रमण विभागाकडे शिफारशी करण्यात याव्यात. अशा परवानग्या देताना रस्ता, पदपथांवर कोणतेही खड्डे घेतले जाणार नाहीत व मान्य जागेमध्येच फटाके विक्री वगळून इतर व्यवसाय केले जातील याबाबतचे हमीपत्र घेवूनच परवानग्या देण्यात याव्यात. असे आदेशात म्हटले आहे.