प्रलंबित इलेक्ट्रॉनिक बाईकचा प्रस्ताव मंजूर
| ही योजना राबविणारी देशातील पहिली महापालिका
पुणे : पुण्यातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे महापालिकेने इलेक्ट्रॉनिक बाइकच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ५०० ठिकाणांवर इ बाईक स्टेशन केले जाणार होते. पण पहिल्या टप्प्यात २५० स्टेशन उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या संकल्पनेतून ही योजना आकाराला आली आहे. बालवडकर शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष असताना हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रशासनाने हा प्रस्ताव मंजूर करण्यास खूप वेळ घेतला.
– पालिकेला 2% महसूल मिळेल
ही योजना प्रायोगिक तत्त्वावर ६ ते १२ महिन्यांसाठी राबविण्यात येणार आहे. यासाठी 3-5 हजार दुचाकी इलेक्ट्रॉनिक बाईक मिळतील. या सर्व बाईक्स कंपनी पुरवणार असून कंपनीकडून त्यांची देखरेख केली जाणार आहे. यामध्ये पालिकेची गुंतवणूक शून्य असून महापालिकेला 2% महसूल मिळणार आहे. यासाठी 500 ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या बाईकवर किमीसाठी 4 रुपये आकारले जातील. त्याचवेळी महामंडळाकडून ५० ते ६० सीएनजी मिनी बसेस खरेदी करून त्या पीएमपीएलमध्ये समाविष्ट केल्या जातील.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘शहरात इ बाईक भाड्याने देण्यासाठीचा प्रस्ताव मान्य केला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात २५० ठिकाणी या बाईक भाड्याने मिळतील. तेथेच चार्जिंग स्टेशनची सुविधा असणार आहे. कंपनीकडून ५०० जागांची मागणी केली होती, पण ती अद्याप मान्य केलेली नाही. पुढील सहा महिन्यात कंपनीकडून सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील त्यानंतर ही सेवा पुणेकरांना उपलब्ध होईल.
—
माझ्या संकल्पनेतून हा प्रस्ताव आकाराला आला. मी शहर सुधारणा समितीचा अध्यक्ष असताना हा प्रस्ताव मी समितीसमोर ठेवला होता. यामुळे शहरातील पर्यावरणाचे रक्षण होईल. तसेच त्याला शासनाची मान्यताही मिळाली आहे. दरम्यान आता स्थायी समितीने देखील या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. लवकरच पुणेकरांच्या सेवेत इ बाईक सादर होतील.– अमोल बालवडकर, माजी नगरसेवक, भाजप