फडणवीस यांच्या वयापेक्षाही जास्त काळ पवार साहेब राजकीय जीवनामध्ये सक्रिय
: पुणे शहर राष्ट्रवादीचे देवेंद्र फडणवीस यांना उत्तर
पुणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले आहे. फडणवीस यांच्या वयापेक्षाही जास्त काळ पवार साहेब महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय जीवनामध्ये पूर्ण प्रभावाने सक्रिय आहेत. त्यांनी या काळात राजकीय आणि सामजिक अवकाश व्यापून टाकला आहे. मात्र, २० वर्षांच्या, त्यातही निम्मा काळ नागपूर शहरातील एका मतदारसंघापुरते सक्रिय असणाऱ्या फडणवीस यांनी पवार साहेबांवर टीका करणे अगदीच हास्यास्पद आहे. शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पदावर बसावे लागले आहे. त्याचीच मळमळ फडणवीसांच्या मनातून अशा पद्धतीने बाहेर पडत आहे, हे या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते. असा टोला पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.
जगताप म्हणाले, साहेबांनी सहा दशकांच्या कारकीर्दीमध्ये १४ निवडणुका लढवल्या आणि सर्वच्या सर्व वाढत्या मताधिक्याने जिंकल्या. वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर देशाच्या १३ राज्यांमध्ये आमदार निवडून आणणे, तीन राज्यांमध्ये खासदार निवडून आणणे, केंद्रातील सत्तेमध्ये सहभागी होणे, ही किमया शरद पवार साहेबच करू शकतात. या जोडीला बीसीसीआय आणि आयसीसी या क्रिकेट संघटनांची धुराही त्यांनी सांभाळली. राज्यातील अनेक संस्था-संघटनांना आधार दिला. अनेक संघटना उभारून, त्या जागतिक दर्जाच्या केल्या. अमेरिकेच्या अध्यक्षांपासून वेगवेगळ्या देशांच्या प्रमुख नेत्यांबरोबर संबंध निर्माण केले. याउलट, फडणवीसांना स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्यासाठीही कोणत्या तरी लाटेचा आधार घ्यावा लागतो. पवार साहेबांसारख्या पात्रतेचा विचार करायलाही फडणवीसांना दुसरा जन्म घ्यावा लागेल.
केवळ निवडणुकीचा विचार करून लोकप्रिय घोषणा करायच्या आणि कोणत्या तरी लाटेवर स्वार होऊन निवडणूक जिंकायची, हा पवार साहेबांचा स्वभाव नाही. राजकारण करत असताना, केवळ निवडणुकांपुरता विचार करायचा नसतो. तर, या राजकारणातून सर्वसामान्यांच्या कल्याणाचा विचार करायचा असतो, माणसांना जोडायचे असते. त्यांची आयुष्ये उभी करायची असतात. पवार साहेबांनी राज्यामध्ये किती नेते उभे केले आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत. आजही, फडणवीस यांनी त्यांच्या आजूबाजूला पाहिले, तर पवार साहेबांच्या आशीर्वादावर मोठे झालेले नेतेच त्यांना दिसतील. फडणवीसांनी एकदा पक्षाची झूल अंगावरून फेकून उभे राहावे, मग त्यांना त्यांची ताकद काय आहे, हे कळून येईल. केवळ स्पर्धेपूर्वी औषधे खाऊन दंडाच्या बेटकुळ्या फुगवण्यासारखी फडवणीसांची अवस्था आहे. तर, पवार साहेबांच्या तालमीमध्ये फडणवीसांपेक्षा जास्त ताकदीचे कितीतरी नेते तयार झाले आहेत. पण, कोणत्या तरी लाटेवर स्वार होऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री आणि दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते झालेल्या फडणवीस यांना वास्तवाचे भान आलेले नाही, हेच पुन्हा एकदा दिसून येते. असे ही जगताप म्हणाले.
COMMENTS