पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नगरसेवकांना उपस्थित राहण्याची संधी
: 250 जणांना परवानगी
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पतुळ्याचे अनावरण पुणे मनपा आवारात होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी महापालिका भवनात येणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रमासाठी अवघ्या 25 ते 30 जणांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यातही नगरसेवकांनाही या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यावर त्यावरून वाद सुरू झाला होता. मात्र, या वादावर अखेर पडदा पडला आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे 200 ते 250 जणांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. त्यामुळे नगरसेवकांसह अधिकारी तसेच कार्यक्रमाशी संबधित कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी महापालिकेत उपलब्ध असलेली जागा व पंतप्रधानांचा ताफा याचा विचार करता सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्या उपस्थितांत हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबधित कार्यक्रम भाजप अल्प उपस्थितीत करत असल्याची टीका सुरू झाली होती. मात्र, अखेर सुरक्षा यंत्रणेशी चर्चा करून नगरसेवकांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू देण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच महापालिकेचे व्यवस्थेतील अधिकारी, कार्यक्रमाच्या ठिकाणी स्पीकर, सजावट, मांडव यासह इतर कामासाठी असलेले कर्मचारी यांना पास दिले जाणार असल्याचे महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
COMMENTS