Ganesh Bidkar BJP | गटनेते गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी | शहराच्या विकासाला आणखी गती देत पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवणार – गणेश बिडकर
Pune Breaking News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा ठाम विश्वास दाखवत मोठ्या बहुमताने सेवा करण्याची संधी दिली आहे. पक्षाचे ११९ नगरसेवक विजयी करत नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी भाजपाचे सर्व नगरसेवक कटिबद्ध असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी ठोस आणि परिणामकारक काम केले जाईल, असा विश्वास भाजपाचे गटनेते गणेश बिडकर यांनी व्यक्त केला आहे. नवनिर्वाचित ११९ भाजप नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. (Pune PMC News)
महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप नगरसेवकांच्या गटाची नोंदणी विधानसभवन येथे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नवनिर्वाचित सभासदांची नोंदणी व इतर शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. या प्रसंगी शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सलग तिसऱ्यांदा माझ्यावर गटनेते पदाची जबाबदारी सोपवली, याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. पुणे शहर अधिक गतिमान, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कायम कटिबद्ध आहे. मेट्रो, नदी सुधार यांसारखे मोठे विकास प्रकल्प मार्गी लावतानाच, सामान्य पुणेकरांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यावर आमचा विशेष भर राहणार आहे.”
——–
पुण्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. मी महापालिकेतील विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी विकासासाठी कायम सकारात्मक आणि मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या स्वप्नातील विकसित, आधुनिक आणि सक्षम पुणे शहर साकार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सर्व नगरसेवक एकजुटीने कार्य करतील, अशी भावनाही यावेळी गटनेते गणेश बिडकर यांनी व्यक्त केली.

COMMENTS