आता नॉन कोविड कामांना प्राधान्य द्या
: राज्याचे उपसंचालक डॉ रामचंद्र हंकारे यांचे पुणे मनपाला निर्देश
पुणे : आरोग्य विषयक कामकाजात पुणे महापालिका ही नेहमीच अग्रेसर राहिली आहे. याबाबत राज्य सरकारकडून नेहमीच कौतुक देखील होत असते. मात्र कोविड आल्यापासून महापालिकेची नॉन कोविड कामात घसरण झालेली दिसून येत आहे. त्या धर्तीवर आता नॉन कोविड कामांना प्राधान्य देण्याचे आदेश राज्य आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ रामचंद्र हंकारे यांनी दिले आहेत. शिवाय मनुष्यबळाचे सुसूत्रीकरण करण्याचे आदेश देखील डॉ हंकारे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत.
: आरोग्य विषयक कामाचा घेतला आढावा
राज्यातील आरोग्य सेवेशी संबंधित RMNCH+A, क्षयरोग / कुष्ठरोग, कोविड लसीकरण आणि किटकजन्य आजार या महत्वाच्या कार्यक्रमांचा व इतर सर्व विषयांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने सन २०२१-२२ मध्ये सर्व निर्देशांकाची उद्दिष्टे पुर्ण होण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्राकरीता राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून डॉ हंकारे यांची राज्य स्तरावरुन नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रा अंतर्गत झालेल्या कार्यक्रमांच्या आढाव्यासंबंधात महानगरपालिकेतील आरोग्य सेवेशी संबधित सहाय्यक आरोग्य अधिकारी, शहर क्षयरोग अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, आरसीएच ऑफीसर, वैदयकीय अधिक्षक रुग्णालय, सर्व नोडल ऑफीसर, परिमंडळ वैदयकीय अधिकारी, प्रभाग वैदयकीय अधिकारी, निवासी वैदयकीय अधिकारी प्रसुतीगृह, वैदयकीय अधिकारी हेल्थ पोस्ट, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, शहर लेखा व्यवस्थापक व महानगरपालिका स्तरावरील सर्व कार्यक्रम अधिकारी यांची बैठक डॉ हंकारे यांनी घेतली. घोले रोड आर्ट गॅलरी सभागृहात आरोग्य अधिकारी डॉ.वैशाली जाधव, वैद्यकीय प्रशासक डॉ.पाटील, डॉ.देवकर, डॉ.चकोर आणि NUHM कर्मचारी यांनी सादरीकरण केले. त्यावेळी त्यांनी महापालिकेला नॉन कोविड कामावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.
: मनुष्यबळाचे सुसूत्रीकरण करण्याचे आदेश
याबाबत डॉ हंकारे यांनी ‘द कारभारी’ शी बोलताना सांगितले कि आरोग्य विषयक कामकाजात पुणे महापालिका ही नेहमीच वरच्या स्थानावर राहिली आहे. मात्र कोविड आल्यापासून महापालिकेचे सर्व लक्ष कोविड च्याच कामाकडे लागले आहे. मात्र आता कोविड चा कहर कमी झाला आहे. त्यामुळे आता नॉन कोविड कामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण सरकारच्या सर्व योजनाची नागरिकांना गरज असते. त्यामुळे आता वेगवेगळे सर्वे करून लोकांना या योजनाचा लाभ देणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे महापालिकेने हे काम करणे गरजेचे आहे, असे आम्ही आरोग्य विभागाला सांगितले. डॉ हंकारे पुढे म्हणाले, या सोबतच आरोग्य विभागाच्या मनुष्यबळाचे सुसूत्रीकरण करणे देखील आवश्यक झाले आहे. ते करण्याचे आदेश मनपाला देण्यात आले आहेत. कारण त्यातून महापालिका योग्य नियोजन करून योजना राबवता येतील. समाविष्ट गावाह्या बाबतीत एक सविस्तर प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारला देण्यास देखील सांगण्यात आले आहे. शिवाय महापालिकेच्या सर्वच पदांचा एक बृहत आराखडा करण्याचे आदेश देखील महापालिकेला देण्यात आले. आगामी काळात लवकरच आढावा घेण्यात येईल आणि महापालिकेच्या कामाची गती बघितली जाईल. असे देखील डॉ हंकारे म्हणाले.
COMMENTS