दोन्ही पालखी मार्गांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पाहणी
महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी खासदार श्री रणजीत सिंह नाईक निंबाळकर जी यांच्यासह पाहणी केली.
श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५ जी) हा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – बारामती – इंदापूर – अकलुज – बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण ११ पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.
पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० व दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
—-
महाराष्ट्रातील आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी खासदार श्री रणजीत सिंह नाईक निंबाळकर जी व अधिकारी यांच्यासह पाहणी केली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५) हा २३४ किमी लांबीचा मार्ग हडपसर (पुणे) – सासवड – जेजुरी – निरा – लोणंद – फलटण – नातेपुते – माळशिरस – बोंडले – वाखरी – पंढरपूर असा असून या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे. या मार्गावर एकूण १२ पालखी स्थळे असून याठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतील.
सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि बाबींवर आधारित काम करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.
पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० व दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.