NCP Ajit Pawar | कोणत्याही पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही | अजित दादांनी ठामपणे जाहीर केले | दीपक मानकर
Deepak Mankar News – (The Karbhari News Service) – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधानपरिषदेवर संधी न दिल्याने अनेक पदाधिकारी नाराज आहेत. दरम्यान पक्षाच्या विविध पदावरून जवळपास ८०० हुन अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. दरम्यान यावर अजित पवार यांनी दीपक मानकर यांची भेट घेत नाराजी दूर केली आहे. अजितदादा हे पुणे शहर कार्यकारणीच्या कार्यावर अत्यंत समाधानी असून पुण्यातील कार्यकर्त्यांवर आपले विशेष प्रेम आहे. त्यामुळे कोणत्याही पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही, असे दादांनी ठामपणे जाहीर केले आहे. त्यानंतर मानकर यांनी आपली भूमिका मवाळ केली आहे. (Pune Politics)
मानकर यांनी काय केले आवाहन!
पुणे शहरातील सर्व नगरसेवक, प्रदेश प्रतिनिधी, सर्व सेलचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना माझा नमस्कार ! माझ्यावर विश्वास ठेऊन आपण सर्वांनी परवा सामूहिक राजीनामे दिले आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात त्याचा मी नेहमीच ऋणी राहीन.
गेल्या काही दिवसांत आपल्या पक्षात घडलेल्या घटनांची योग्य दखल घेऊन आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज, शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी मुंबई पक्ष कार्यालयामध्ये बोलावून माझी भेट घेऊन पुणे शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला.
अजितदादा पुणे शहर कार्यकारणीच्या कार्यावर अत्यंत समाधानी असून पुण्यातील कार्यकर्त्यांवर आपले विशेष प्रेम आहे. त्यामुळे कोणत्याही पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही, असे दादांनी ठामपणे जाहीर केले आहे.
शहरातील सर्वच कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आपण तयार केलेले संघटन कौतुकास्पद असून त्यांच्या बळकटीसाठी आणि पक्षवाढीसाठी उपयोगी होणाऱ्या विधानपरिषदेसाठी आपण मागणी केली होती. परंतु काही कारणास्तव ती मागणी पूर्ण करता आली नाही. परंतु येत्या काळात आपल्याला योग्य वेळी योग्य न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दादांनी यावेळी दिली. शहरातील सर्वच कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या कामाची प्रशंसा करत दादांनी या कार्याची योग्य पोचपावती लवकरच दिली जाईल असा ठाम विश्वास मला दिला आहे.
पुणे शहर आपला बालेकिल्ला असून कोणत्याही कार्यकर्त्यांनी नाराज न होता येत्या विधानसभेत महायुतीचे जोमाने काम करून आपल्या पक्षाची ताकद दाखवून देऊया, मी आपल्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा शब्द मा. अजितदादानी यावेळी दिला.
तरी सर्वांना विनंती आहे की आपली एकी अशीच ठेऊन आपण येत्या विधानसभेला जोमाने सामोरे जाऊयात. तरी आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने दादांच्या पाठीशी राहून पुणे शहरातील आपले संघटन अजून जोमाने वाढवूया आणि दादांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवूया.
तसेच उद्या (शनिवार, १९ ऑक्टोबर, २०२४ रोजी पुणे पक्ष कार्यालय, गुप्ते मंगल कार्यालय येथे होणारी बैठक रद्द करण्यात येत आहे. विधानसभा मतदारसंघ नियोजनासाठी लवकरच पुढच्या बैठकीचा तपशील जाहीर केला जाईल. असे मानकर यांनी म्हटले आहे.
COMMENTS