National Voters Day 2024 | राष्ट्रीय मतदार दिन |पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन

HomeBreaking Newsपुणे

National Voters Day 2024 | राष्ट्रीय मतदार दिन |पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन

गणेश मुळे Jan 25, 2024 3:58 PM

2 thousand 625 crore compensation allocation for land acquisition of Pune Western Ring Road
New Collector of Pune IAS Suhas Diwase  | Transfer of IAS Dr. Rajesh Deshmukh
Pune Election Final Voter List 2024|पुणे जिल्ह्याची अंतिम मतदार यादी जाहीर | तरुण मतदारांच्या संख्येत ६५ हजारांची वाढ

National Voters Day 2024 | राष्ट्रीय मतदार दिन |पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन

 

|शहरी मतदानातील उदासीनता दूर करण्यासाठी नवमतदारांची भूमिका महत्त्वाची | जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

 

National Voters Day 2024 |  पुणे| शहरी मतदारांची मतदानातील उदासीनता दूर करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवा मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने यावर्षीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान नोंदणी झालेल्या नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. (National Voters Day 2024)

जिल्हाधिकारी कार्यालयात १४ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, मतदार हा आपला लोकशाहीचा कणा आहे. मतदारांसाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्यादृष्टीने मतदार दिन महत्वाचा आहे. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून आणि लोकशाहीने आपल्याला स्वातंत्र्य, मूलभूत हक्क दिले आहेत. हे अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येकाचा लोकशाही प्रक्रियेत सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मतदार दिनाचा कार्यक्रम महत्वाचा असून येणारे वर्ष हे निवडणूक वर्ष असल्यामुळे या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाला अधिकच महत्त्व आहे.

लोकशाही व्यवस्थेत चांगली मतदार यादी असण्यापासून भयमुक्त, निकोप निवडणूकांपर्यंत सर्व बाबी महत्वाच्या आहेत. यात समाविष्ट सर्व प्रशासकीय घटकांसोबतच राजकीय पक्षांचेही महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीच्या टप्प्यावर पारदर्शितेसाठी राजकीय पक्षांना सहभागी करून घेण्यात येते. त्यामुळे आपल्या निवडणूक यंत्रणेवरील विश्वसनीयता अधिक दृढ होते, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

निवडणुक प्रक्रिया राबविण्याएवढेच चांगली, शुद्ध मतदार यादी तयार करणेही महत्वाचे आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकालही योग्य ठरतो. जिल्ह्यात कोविड नंतर मतदार यादी शुद्ध करण्यासाठी गेल्या तीन वर्षात खूप चांगले झाले आहेत. गेल्या तीस वर्षात निवडणूक प्रकियेत तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असून 7 ते 8 लाखापेक्षा जास्त मयत, कायम स्थलांतरीत, दुबार मतदारांची वगळणी यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग झाला आहे. आपली मतदार यादी अजून शुद्ध करण्यासाठी पात्र नवमतदारांची नोंदणी आवश्यक आहे, त्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

मतदार नोंदणी व मतदार यादी शुद्धीकरणात जिल्ह्याने केलेल्या चांगल्या कामगिरीचे श्रेय मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी-कर्मचारी, विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्था, राजकीय पक्ष यांना असल्याचेही डॉ.देशमुख म्हणाले.

अपर जिल्हाधिकारी श्री. मोरे म्हणाले, लोकशाहीत निवडणुकांना महत्त्व आहे. मतदार यादी शुद्ध असेल आणि लोकांचा विश्वास असेल तर लोकशाही अधिक प्रगल्भ होते. मुक्त आणि नि:पक्ष निवडणूकांसाठी शुद्ध मतदार यादी महत्त्वाची असते. मतदार यादी शुद्ध करण्यासाठी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी वर्षभर चांगले प्रयत्न केले आहेत अशा शब्दात त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती कदम यांनी सर्वांना राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकात श्रीमती कळसकर यांनी भारत निवडणूक आयोगाच्या स्थापनेनंतर पहिल्या मतदार नोंदणीबाबत माहिती दिली. महिलांचे संपूर्ण नाव मतदार यादीत असले पाहिजे हा आग्रह पहिल्यांदा आयोगाने धरल्यामुळे महिलांना खरी ओळख मिळाल्याचे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमादरम्यान विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दौंडचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, सहायक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे, भोसरी येथील नायब तहसीलदार अपर्णा देशपांडे तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दिलेला संदेश दाखविण्यात आला. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उपस्थितांना लोकशाहीवर निष्ठा राखण्याची शपथ दिली. प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर पथनाट्याचे सादरीकरण करून मतदार दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

महाविद्यालयातील शंभर टक्के नवयुवा मतदारांची नोंदणी केल्याबद्दल पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाचा सत्कार यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमात मतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण व स्वीप कार्यक्रमात चांगली कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट निवडणूक नायब तहसीलदार, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, उत्कृष्ट पर्यवेक्षक आणि उत्कृष्ट महसूल सहायक यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.