मुरलीधर मोहोळ यांचा आरोप म्हणजे स्वत:च्या पक्षाचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न | आमदार सुनिल टिंगरे आणि चेतन तुपे
| भाजपच्या टिकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर
पुणे | मिळकतकरातील 40 टक्के सवलत पुन्हा लागू करावी यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकत्र येऊन विधी मंडळाचे काम सुरू होतानाच आंदोलन केले. मात्र याला भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी नौटंकी असे संबोधले होते. या टीकेला राष्ट्रवादी आमदार सुनिल टिंगरे आणि चेतन तुपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार सुनिल टिंगरे आणि चेतन तुपे म्हणाले, मिळकतकरातील 40 टक्के सवलत पुन्हा लागू करावी यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकत्र येऊन विधी मंडळाचे काम सुरू होतानाच आंदोलन केले. मात्र, कसबा निवडणूकीतील पराभवाच्या कारणांचा अहवाल देण्यासाठी आलेल्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना या राष्ट्रवादीच्या आमदारांनी केलेल्या आंदोलनाची माहिती समजल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच्या भेटीचा देखावा करून सवलतीची मागणी केली. मुळातच आमचे आंदोलन नियोजित होते, म्हणूनच या आंदोलनाचे फलकही आधीच तयार केले होते. त्यामुळे त्यांच्या भेटीनंतर आघाडीच्या आमदारांना जाग आली हा मोहोळ यांचा आरोप हास्यास्पद तर आहेच पण स्वत:च्या पक्षाचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्नही आहे. पुणेकरांना ही सवलत पुन्हा लागू व्हावी हीच आमची प्रामाणिक भुमिका असून त्यासाठी आम्ही आवाज उठविणारच.
| काय म्हणाले होते मुरलीधर मोहोळ?
आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर पुण्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांना जाग आली आणि त्यांनी घाईघाईने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनाची नौटंकी केली. स्वतःची निष्क्रियता छाकण्यासाठी केलेल्या आंदोलनाच्या नौटंकीला पुणेकर भुलणार नाहीत, अशा शब्दात मोहोळ यांनी टीका केली होती.