महापालिका प्रभाग रचना : हरकती सूचनांवरील अहवाल सादर करण्यास प्रशासनास पुन्हा मुदतवाढ
पुणे: पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) प्रारूप प्रभागरचनेवरील ( Ward Structure) सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने (State election commission) पुन्हा तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. याचा अहवाल ५ मार्चऐवजी ८ मार्च रोजी आयोगाला सादर केला जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. मूळ मुदत २ मार्च पर्यंत होती. ती वाढवून ५ मार्च केली होती. मात्र पुन्हा एकदा ही मुदत वाढवून देण्यात आली आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग आहे. याची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या. त्यावर सुनावणी घेण्यासाठी यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. २४ व २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतल्यानंतर आता त्याचा अहवाल बनविण्याचे काम सुरू आहे. यामध्ये पूर्व पुणे आणि पश्चिम पुण्यातील प्रभाग रचनेवर आक्षेप असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता आहे. शिवाय पण संपूर्ण शहराच्या हरकतींचा अद्याप विचार झालेला नाही. त्याचा अहवाल २ मार्चपर्यंत आयोगाला सादर करणे आवश्यक होते. पण हे काम अपूर्ण असल्याने आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार आयोगाकडून ५ मार्च पर्यंतची मुदत वाढवून दिली होती. मात्र ५ ला देखील हा अहवाल सादर होऊ शकला नाही. आता ८ मार्च ला हा अहवाल सादर केला जाणार आहे. अशी माहिती महापालिका निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
COMMENTS