Mumbai Pune Express Way Missing Link | एक्स्प्रेस वे वर ३० तास वाहतूक खोळंब्याची जबाबदारी रेंगाळलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचीच | पुण्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून उमटले पडसाद
Pune Mumbai Express way Accident – (The Karbhari News Service) – टॅंकर अपघातामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटात झालेली वाहतूक कोंडी ही सरकारी यंत्रणांचे अपयश असून, हा झालेला प्रकार संतापजनक आहे, अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी केली. तर एक्स्प्रेस वे वर ३० तास वाहतूक खोळंब्याची जबाबदारी रेंगाळलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचीच असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर (Vivek Velankar Pune) यांनी केला आहे.
विवेक वेलणकर म्हणाले, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी होण्याचे मुख्य कारण आहे घाटातील काही अरूंद भाग. यावर पर्याय म्हणून मार्च २०१९ मध्ये १३.५ किमी चा मिसिंग लिंक प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला. हा प्रकल्प मूळ उद्दिष्टानुसार २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र करोना संकटामुळे तो दोन वर्षे पुढे गेला आणि तो २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते , त्यानंतर तारीख पे तारीख करत आता हा प्रकल्प पूर्ण होण्याचा नवीन मुहूर्त १ मे २०२६ झाला आहे
१३.३ किमी च्या या प्रकल्पामध्ये २ बोगदे आणि २ पूल बांधण्यात येणार आहेत. सह्याद्री मधला हा अवघड टेरेन आहे असे कारण सांगून विलंबाचे समर्थन केले जाते आहे. याच सह्याद्री मध्ये ३० वर्षांपूर्वी ९० बोगदे आणि २००० पूल असलेला ७४० किमीचा कोकण रेल्वे प्रकल्प १९९० ते १९९८ अशा आठ वर्षांत पूर्ण करण्यात आला होता हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्या काळापेक्षा तंत्रज्ञान , मशिनरी कितीतरी पटीने अद्ययावत झाली असूनही हा मिसिंग लिंक प्रकल्प रखडण्याची चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी जनतेच्या करांचे ६५०० कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि गेल्या ३६ तासांत वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या हजारो वाहने , नागरीक यांचा वेळ आणि पैसा याचीच किंमत कदाचित यापेक्षा जास्त असेल. प्रशासनाची उदासीनता , निष्क्रियता आणि असंवेदनशील वर्तणूक या सगळ्याच्या मुळाशी आहे आणि असहाय्य नागरीक चडफडण्याशिवाय काहीच करू शकत नाहीत हे दुर्दैव आहे. असे देखील वेलणकर म्हणाले.
——–
सरकारी यंत्रणांचे अपयश संतापजनक – माजी आमदार मोहन जोशी
एका टॅंकर चालकाच्या हलगर्जीपणामुळे अपघात होतो आणि महामार्गावरील वाहतूक ठप्प होते. सुमारे तीस तास वाहने अडकून पडल्याने प्रवाशांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होते. सरकारी यंत्रणा ढिम्मच रहातात. अडकून पडलेल्या लोकांना पाणी आणि बिस्किटे ही मदत अतिशय उशिरा आणि तुटपुंजी मिळते आणि यावर तातडीने उपाययोजना करून मात करण्याऐवजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सरकारने केलेल्या कामांची यादी देत रहातात. हा सगळा प्रकार उद्वेगजनक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
पुणे -मुंबई प्रवासाचा वेळ एक तासाचा करू, अशा घोषणा मुख्य मंत्री करत असतात. आणि दुसरीकडे एका अपघातामुळे तीस तास वाहतुकीची कोंडी होते. ही अस्वस्थ करणारी परिस्थिती असून, एवढा प्रदीर्घ काळ कोंडी राहिली याकडे सरकारने गांभीर्याने पाहिलेच नाही. या निष्काळजीपणामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे .
———

COMMENTS