Mukhyamantri Majhi Ladki Bahin | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’अंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

HomeBreaking Newsपुणे

Mukhyamantri Majhi Ladki Bahin | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’अंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

गणेश मुळे Jul 14, 2024 2:07 PM

ITI Training Center Yerawada | MLA Sunil Tingre | येरवडा येथे होणार आयटीआय प्रशिक्षण केंद्र
Ajit Pawar | महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण निर्णय
Ajit pawar | अजित पवारांनी पुणे महापालिकेकडे मागितली ही माहिती

Mukhyamantri Majhi Ladki Bahin | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’अंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

 

Ajit Pawar – (The Karbhari News Service) –  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’अंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरीता महिलांनी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करावे; राज्यातील एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

बारामती पंचायत समिती येथे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल मिटकरी, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, सहायक गटविकास अधिकारी नंदन जरांडे,बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, राज्याच्या विकासाकरीता मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजनांचा समावेश केला आहे. राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबनाला चालना तसेच विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’योजना, महिलांना वर्षातून ३ सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आठ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना एक महत्वकांक्षी योजना असून या योजनेसाठी एका वर्षाकरीता ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या पात्र महिलांनी ऑनलाईन अर्ज करावे; ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरीता गावतील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आदी स्थानिक यंत्रणेशी संपर्क साधावा. अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांनादेखील जुलै महिन्यापासून लाभ मिळणार असल्यामुळे महिलांनी अर्ज करण्याकरीता गर्दी करु नये. अर्ज करतांना येणाऱ्या अडचणीचे निराकारण करण्याचे काम प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे मिळून ३ हजार रुपये १९ ऑगस्टपर्यंत (रक्षाबंधन) थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आजअखेर १ लाख ३४ हजार ४९८ इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी बारामती तालुक्यात ७ हजार ६४८ इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने शुन्य रक्कमेवर आधारित महिलांचे खाते उघडण्यात येत आहे. सर्व घटकातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याकरीता प्रशासनासोबत सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करावे. महिला वर्गांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता पुढे यावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

यावेळी श्री. पवार यांच्या उपस्थितीत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेअंतर्गत तालुक्यातील ५ महिलांचे प्रातिनिधिक स्वरूपात अर्ज स्विकारण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. बागल यांनी केले.


ग्रामीण भागात जिल्हा परिषदेकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला गती

 

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची शासनाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार पुणे जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेमध्ये सध्या ऑफलाइन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झालेले आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार योजनेच्या अनुषंगाने गाव पातळीवर समित्या गठित करण्यात आलेल्या असून शासकीय कार्यरत यंत्रणांची प्रत्येक गाव, वॉर्ड स्तरावर बैठका घेवून नियोजन करण्यात आलेले आहे. सर्व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मोहीम स्वरूपात योजनेच्या अंमलबजावणीसाठी कॅम्पचे आयोजन करण्याबाबत सरपंच, नगरसेवकांना आवाहन करण्यात आलेले आहे.

गावातील अथवा त्या त्या वार्ड मधील सर्व पात्र लाभार्थ्यांचे ऑफलाइन पद्धतीने हार्ड कॉपी अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात येत आहेत. अर्जांची नोंद अंगणवाडी स्तरावर घेण्यात येत असून त्याबाबतच्या नोंदी नोंदवहीत ठेवण्यात येत आहेत.

प्रत्येक शनिवारी सर्व नोंद झालेल्या लाभार्थ्यांच्या नावांचे चावडी वाचन करून आक्षेप असल्यास पात्र, अपात्रतेबाबत गाव पातळीवरच खातरजमा करून तालुकास्तरावर समितीने अंतिम मान्यता देण्यात बाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.

गावातील प्राप्त झालेल्या सर्व ऑफलाईन अर्जाचे ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरण्याकरिता गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सीआरपी बचत गट तसेच सेतू सुविधा केंद्रातील डाटा ऑपरेटर यांच्यामध्ये वाटप करण्यात येवून ऑनलाईन फॉर्म भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. वेबबेस्ड एप्लीकेशन लिंक तसेच डॅशबोर्डचा अॅक्सेस लवकर प्राप्त झाल्यास कामात सुसूत्रता व अधिक गतिशिलपणे कामकाज होणार आहे.

योजनेच्या प्रसिध्दीसाठी शासनस्तरावरून प्राप्त आदर्श जाहिरात नमुन्याप्रमाणे नगरपालिका व ग्रामपंचायतमार्फत गावातील दर्शनी भागावर व शिबिरांच्या ठिकाणी जाहिरात फलक लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ऑफलाइन पद्धतीने ८९ हजार ९७ अर्ज तर ऑनलाईन पद्धतीने ४५ हजार ४०१ असे एकूण १ लाख ३४ हजार ४९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही मिळून आंबेगांव तालुक्यात १६ हजार २७६ अर्ज प्राप्त झाले आहेत. बारामती १७ हजार ५०९, भोर ४ हजार ३७६, दौंड ७ हजार १०८, इंदापूर १० हजार ८४, हवेली १० हजार ६६५, जुन्नर १२ हजार ८४३, खेड १० हजार ३४, मावळ १३ हजार १८३, मुळशी ५ हजार ४५६, पुरंदर ९ हजार ७१८, शिरुर १५ हजार ८४२ वेल्हा तालुक्यात १ हजार ४३४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थीना लाभ उपलब्ध व्हावा व कोणीही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याची जिल्हा प्रशासनामार्फत संपूर्ण दक्षता घेण्यात येत आहे, असेही श्री. पाटील यांनी कळविले आहे.
००००