Mukhyamantri Majhi Ladki Bahin | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज स्विकारण्याचा शुभारंभ
Mukhyamantri Ladli Behna Yojana – (The Karbhari News Service) – महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील अर्ज स्विकारण्याचा शुभारंभ ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आला. (Maharashtra News)
यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपायुक्त वर्षा लड्डा, विजय मुळीक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.
राज्यात सर्वप्रथम पुणे जिल्ह्यात अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली असून आज श्रीमती आशा पातोंड व स्नेहलता यनभर या दोन महिलांचे अर्ज प्रातिनिधिक स्वरुपात स्विकारण्यात आले.
राज्यातील २१ ते ६० वयोगटातील आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसलेल्या महिलांना ही योजना लागू असून या योजनेंतर्गत दरमहा १ हजार ५०० रुपये दरमहा लाभार्थी महिलेच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात जमा होणार आहेत. राज्य शासन समाजहिताच्या अनेक योजना राबवित असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अधिकाधिक पात्र भगिनींना लाभ होईल असे श्री. महाजन यांवेळी म्हणाले.
महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात १ जुलै २०२४ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. आज जिल्हा परिषदेतर्फे योजनेअंतर्गत १०० लाभार्थी महिलांकडून अर्ज भरून घेण्यात आले. १५ जुलै २०२४ पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.
000