MPSC च्या विद्यार्थ्यांचे पुण्यासह राज्यभरात आंदोलन
पुणे – लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) होणाऱ्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत 2023 ऐवजी 2025 पासून लागू करावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी पुण्यासह राज्यभरात आंदोलन केले. पुण्यात विद्यार्थ्यांनी टिळक चौकात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनामुळे वर्दळीच्या टिळक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवेसाठी वर्णनात्मक परीक्षेचे स्वरूप स्वीकारले आहे. एमपीएससीच्या या निर्णयाचे उमेदवारांकडून स्वागत होत आहे. मात्र ही पद्धत 2025 पासून लागू करावी. म्हणजे आम्हाला अभ्यासाला पुरेसा वेळ मिळेल, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. मात्र राज्य शासनाकडून ही पद्धत याच वर्षीपासून लागू केली जाणार आहे. त्यास उमेदवारांनी विरोध दर्शविला आहे. या परीक्षा पद्धतीची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून करीत आहेत. मात्र याकडे शासन लक्ष देत नसल्याचे आंदोलनकर्त्या उमेदवारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, उत्तरतालिकेतील चुकांपासून परीक्षांच्या तारखांबद्दल एमपीएससीकडून अनेक चुका होत आहेत. करोनामुळे मागील दोन वर्षे वाया गेली आहे. त्यामुळे निदान एवढ्या मागणीचा तरी विचार करावा, असे उमेदवारांची मागणी आहे. पुण्यासह औरंगाबाद, नागपूर आदी ठिकाणी उमेदवारांनी आंदोलन केले. पुण्यातील आंदोलन रात्री उशीरपर्यंत सुरू होते. या आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे.
वर्णनात्मक पद्धत म्हणजे काय
एमपीएससीतर्फे आतापर्यंत राज्यसेवेची मुख्य परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून घेण्यात येत होती. आता ती वर्णनात्मक पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्यात निबंधासारख्या उत्तरांचाही समावेश आहे. तसेच अभ्यासक्रमही यूपीएससीचा कॉपी केल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
राज्यात कधीतरी यूपीएससी दर्जाचा अभ्यासक्रम लागू करावाच लागेल. हा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. मात्र ही मागणी मान्य केली तर 2025 मधील उमेदवार 2027 मध्ये लागू करा अशी मागणी करतील. त्यामुळे या संदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल.
–देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री