MP Supriya Sule | ‘त्या’ शिक्षकाच्या कुटुंबाला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला कृतिशील आधार
| दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच मातेला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न
Maharashtra News – (The Karbhari News Service) – पगार नाही म्हणून आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. याबरोबरच त्यांना कायम रोजगार मिळावा यासाठीही त्या प्रयत्न करणार आहेत. केज तालुक्यातील केळगाव येथे आश्रम शाळेत तब्बल अठरा वर्षे काम करूनही पगार मिळत नसल्याने आपल्या अवघ्या तीन वर्षीय लेकीला पत्र लिहून माफी मागत या शिक्षकाने आत्महत्या केल्याने उभा महाराष्ट्र हळहळला होता. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेबाबत संवेदनशीलता दाखवत खासदार सुळे यांनी या कुटूंबाला पूर्णपणे आधार द्यायचा निर्णय घेतला आहे. (Beed News)
केळगाव येथील आश्रमशाळेत धनंजय नागरगोजे हे गेल्या अठरा वर्षांपासून कार्यरत होते. वारंवार पगार मागूनही त्यांना पगार दिला गेला नाहीच उलट ‘तू आत्महत्या कर’ असा जीवघेणा सल्ला संस्था चलकांकडून दिला गेल्याचे स्वतः नागरगोजे यांनीच आपल्या लेकीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मुलांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काही करू शकलो नाही, असे म्हणत अवघ्या तीन वर्षांच्या लेकराची माफी मागत त्यांनी आपले जीवन संपवले. या कुटूंबाची माहिती मिळताच सुळे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आधार दिला. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी आता नागरगोजे यांच्या कुटूंबाला प्रत्यक्ष कृतीतून आधार द्यायचे ठरवले आहे.
ज्या मुलीच्या नावे नागरगोजे यांनी पत्र लिहिले ती तीन वर्षांची त्यांची लेक आणि त्यांच्या पत्नीच्या उदरात वाढत असलेले दुसरे अपत्य या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सुळे यांनी घेतली आहे. याशिवाय त्या मातेला आणि त्यांच्या दिराला नोकरी मिळावी यासाठी शासनदरबारी आपण पाठपुरावा करू, असे अश्वासनही त्यांनी दिले आहे. याबरोबरच विनाअनुदानित आश्रम शाळांना टप्पा अनुदान मिळूनही अद्याप शासनाकडून या शाळांना निधी मिळाला नाही, तो लवकरात लवकर मिळावा, यासाठीही पाठपुरावा करू असे सुळे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे पदवीधर सेल चे प्रदेशाध्यक्ष डॉ नरेंद्र काळे यांनी काल (दि. १९) केज तालुक्यात देवगाव येथे नागरगोजे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. तसेच त्यांची विचारपूस करत खासदार सुप्रियाताई सुळे या कुटुंबाच्या पाठीशी समर्थपणे उभ्या असून कोणत्याही प्रकारची चिंता करू नये, असा शब्द दिला.
COMMENTS