आमदार सुनील टिंगरे करणार लाक्षणिक उपोषण
: महापालिका आयुक्तांना दिले पत्र
आमदार टिंगरे यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. पत्रानुसार धानोरी येथील पोरवाल रस्ता परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहे. तब्बल 500 पेक्षा अधिक सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. मात्र, या भागाला जाणारा पोरवाल हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी पोरवाल रस्त्याला समांतर असा रस्ता कलम 205 अंतर्गत रस्ता विकसित करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, या रस्त्याचा काही भाग धानोरी हदीत तर काही भाग लोहगाव हदीत येत आहे. लोहगाव हदीतील भागावर पीएमआरडीएच्या माध्यमातून बांधकाम परवानग्या देण्यात आल्या आहेत, त्यामुळे हा रस्ता अर्धवट विकसित झाला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी बांधकामे झाली आहेत, त्याऐवजी 205 अंतर्गत सुधारित रस्त्याची आखणी करण्यात यावी आणि रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी मी गेली दोन वर्षे मागणी करीत आहे. त्यासाठी आयुक्त, मुख्य अभियंता, पथ विभाग प्रमुख यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. स्वतः आयुक्त विक्रम कुमार, पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी कुलकर्णी आणि तत्कालीन प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी जागेवर जाऊन पाहणी केली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. प्रशासनाकडून ही सहकार्य मिळत नाही. त्यामुळे मला नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मी गुरुवार ( दि. 24 फेब्रु.) रोजी लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. असे आमदार टिंगरे यांनी पत्रात म्हटले आहे.
COMMENTS