MLA Sunil Kamble | ससूनला मिळणार पुरेशे मनुष्यबळ | आमदार सुनिल कांबळे यांनी अधिवेशनात वाचला ससूनच्या तक्रारींचा पाढा
Sasoon Hospital – (The Karbhari News Service) – ससून सर्वोपचार रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पुढील आठ दिवसात सुरू केली जाणार आहे. कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल कांबळे यांनी ससून रुग्णालयाच्या विविध समस्यावर राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत ससून रुग्णालयाच्या समस्यांचा पाढाच वाचला. यावर राज्याच्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आमदार कांबळे यांनी उपस्थित केलेले प्रश्न वस्तुस्थिती असल्याचे मान्य करत या प्रकरणी आठ दिवसात भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले. (Pune News)
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व परिसरातील हजारो रुग्ण येथे उपचारासाठी येतात. मात्र, या रुग्णालयातील आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय व्यवस्थेत अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे, शस्त्रक्रिया साधनसामग्री आणि औषधांचा तुटवडा वारंवार जाणवत आहे. अत्यावश्यक सेवा, विशेषतः आपत्कालीन विभाग व सर्जरी विभाग, योग्य प्रकारे कार्यरत नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे गरीब व गरजू रुग्णांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थापन अत्यंत असमाधानकारक आहे. वॉर्ड व ओपीडी विभागात स्वच्छतेचा अभाव असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, ससून बाबत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न वस्तुस्थिती आहे. ससून रुग्णालयास २३५० पदे मंजूर असून त्यातील ७८९ पदे रिक्त आहेत. परिचारकांची १६० पदे रिक्त आहेत. चतुर्थ श्रेणीची ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या कामावर ताण येत आहे. चतुर्थश्रेणी कामगार पदे टीसीएस च्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय भरते. त्याबाबत याबाबतही सूचना केल्या होत्या. मात्र ही भरती झालेली नाही.मात्र, पुढील आठ दिवसात ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन मिसाळ यांनी दिले तसेच स्वच्छतेच्या कामाची तपासणी करून चौकशी. करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
COMMENTS