व्यवहार्य पर्याय नसल्याने लकडी पुलावर मेट्रोचे काम सुरु करणार : महापौर मोहोळ
– सुचवलेल्या पर्यायाने खर्च ७० कोटींनी आणि कालावधी दोन वर्षांनी वाढणार
पुणे : छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या कामासाठी गणेशोत्सव मंडळांनी आणि मेट्रोने सुचवलेले पर्याय व्यवहार्य नसल्याचा अहवाल मेट्रो तांत्रिक तज्ञांकडून प्राप्त झाला असून यापेक्षा अधिक काळ मेट्रोचे काम बंद ठेवणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने उचित नाही. म्हणूनच मेट्रोचे काम पुन्हा सुरु असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
गणेश विसर्जन मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराज पुलाववरील मेट्रो मार्ग अडथळा ठरेल, असा आक्षेप काही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. त्यावर मेट्रोचे काम थांबवून महापौर मोहोळ यांनी गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, मेट्रो अधिकारी आणि तज्ञांच्या तीन बैठका घेतल्या होत्या. शिवाय महापौर मोहोळ यांनी कार्यकर्त्यांकडून पर्यायही मागवला होता. या पर्यायांचा अभ्यास मेट्रोने अभ्यास केल्यानंतर मेट्रोने सुचविलेले दोन्ही पर्यायही व्यवहार्य नसल्याचा निष्कर्ष निघाला होता. त्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी काम सुरु करण्यास सांगितले आहे.
याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘विकासाची कामे करत असताना संस्कृती जपणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहेच. मीही स्वतः आधी गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्त्या आणि नंतर लोकप्रतिनिधी आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाने आजवर समाजभान जपत झालेले बदल स्वीकारले. काळानुरूप बदलत, परंपराही जपत पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाने जगाच्या नकाशावर छाप उमटवली. मेट्रोच्या अर्थात शहर विकासाच्या मुद्द्यावरही कार्यकर्ते साथ देत मेट्रोच्या कामाला साथ देऊन पुण्याच्या प्रगतीचे साक्षीदार होतील.’
गणेशोत्सव मंडळांनी दिलेल्या पर्यायात मेट्रो मार्ग खंडित करण्याचा पर्याय होता. मात्र देशभरातील कोणत्याही मेट्रोने असा पर्याय कुठेही अवलंबला गेला नाही. याबाबत मेट्रो मार्ग सलग ठेवण्याची मेट्रोची भूमिका होती. तर मेट्रोने सुचवलेल्या पहिल्या पर्यायानुसार पुलाच्या आजूबाजूचे ३९ पिलर पाडून नव्याने बांधावे लागणार होते. त्यासाठी ७० कोटी रुपयांचा खर्च आणि २४ महिन्यांचा अतिरिक्त कालावधी लागणार होता. दुसऱ्या पर्यायानुसार १७ पिलर पाडून नव्याने बांधणे हाही होता. त्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी आणि २३ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार होता. त्यामुळे व्यावहारिक विचार करता आणि कामाची सद्यस्थिती लक्षात घेता दोन्ही पर्याय योग्य नसल्याचे मेट्रोच्या तांत्रिक तज्ज्ञांचे म्हणणे होते. या सर्व बाबी लक्षात घेता, आहे त्या परिस्थितीत काम सुरु करण्याचा पर्याय अधिक योग्य वाटला’, असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
COMMENTS