Gholap College| बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

HomeपुणेBreaking News

Gholap College| बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

Ganesh Kumar Mule Feb 27, 2023 3:41 PM

Baburaoji Gholap College | दिल्लीत होणार्‍या पथसंचलनासाठी राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र कु. अनुष्का सचिन साठे हिची निवड
Librarian Day | Baburaoji Gholap College | बाबुरावजी घोलप महाविद्यालयात ग्रंथपाल दिवस उत्साहात साजरा
Baburaoji Gholap College | “शांतता, पुणेकर वाचत आहेत” या उपक्रमास बाबुरावजी घोलप महाविद्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद 

बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

| छत्रपती शिवरायांचे भाषाविषयक धोरण आजही मार्गदर्शक – प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे

सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये कवी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करत जागतिक मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयातील मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. संजय टाक यांच्या ‘छत्रपती शिवरायांचे भाषाविषयक धोरण व आजची मराठी‘ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांच्या हस्ते या व्याख्यानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. संगीता जगताप, प्रा. विजय घारे, डॉ. वंदना पिंपळे, मराठी विभाग प्रमुख डॉ. सुवर्णा खोडदे, समन्वयक डॉ. विजय बालघरे, ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या व्याख्यानाचे प्रास्ताविक करत असताना डॉ. विजय बालघरे यांनी मराठी भाषा गौरव दिनाची संकल्पना स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिल्यास ते उत्तम कार्य करू शकतात असे नमूद केले.

आपल्या मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचे प्रयोजन स्पष्ट करत भाषा ही प्रभावी असून ती सातत्याने बदलत असल्याने भाषिक बदल समजून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.तसेच विविध वृत्तपत्रात लेख लिहिलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत यातूनच उद्याचे प्रतिभावंत लेखक निर्माण होतील अशी आशा व्यक्त केली.
‘छत्रपती शिवरायांचे भाषाविषयक धोरण व आजची मराठी‘ या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करत असताना प्रा. संजय टाक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषा विषयक धोरण सविस्तर स्पष्ट करत छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी, पारसी इंग्रजी, संस्कृत या भाषेबरोबरच मराठी भाषेचा आग्रही धरला असल्याचा दाखला देत असताना राज्यव्यवहार कोष ग्रंथाचे उदाहरण दिले. तसेच छत्रपती संभाजी महाराजांना अनेक भाषा अवगत असल्याचे नमूद करत छत्रपती शिवरायांचे भाषाविषयक विचार हे दूरदृष्टीचे असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शुभम साठे या विद्यार्थ्याने मराठी भाषागीताचे स्वतःच्या स्वरात गायन केले.जागतिक मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत विविध मराठी वृत्तपत्रात लेख प्रकाशित झालेल्या साहील कांबळे,रवींद्र चंडालिया,सरगम वानखेडे या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या लेखांचे स्पंदन भित्तिपत्रकासाठी प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर ‘आई‘ या विषयावर कविता सादर करणाऱ्या साक्षी नागसेन या विद्यार्थिनीच्या कवितेने उपस्थित विद्यार्थ्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.
महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या व्याख्यानाचे सुत्रसंचालन डॉ. सुवर्णा खोडदे तर आभार प्रदर्शन डॉ. विठ्ठल नाईकवाडी यांनी केले. या व्याख्यानासाठी सुमारे १२० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते.