Mahavikas Aghadi | भाजपामधील आयारामांना इंडिया आघाडीने उमेदवारी देऊ नये | सामाजिक कार्यकर्त्याचा इशारा

HomeBreaking News

Mahavikas Aghadi | भाजपामधील आयारामांना इंडिया आघाडीने उमेदवारी देऊ नये | सामाजिक कार्यकर्त्याचा इशारा

Ganesh Kumar Mule Oct 04, 2024 9:02 PM

Baramati Latest News | बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Lata Mangeshkar Award 2023 | 2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर
Vidhansabha Election Maharashtra | आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी सर्व संबंधितांनी चोखपणे कर्तव्य बजावावे – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Mahavikas Aghadi | भाजपामधील आयारामांना इंडिया आघाडीने उमेदवारी देऊ नये | सामाजिक कार्यकर्त्याचा इशारा

 

Social Workers – (The Karbhari News Service) – अडचणीच्या काळात आपापले पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांना इंडिया आघाडी – महाविकास आघाडीने पुन्हा पक्षात घेऊन त्यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यास त्या मतदार संघात आम्ही त्या उमेदवाराचे काम करणार नाही, अशा इशाऱ्याचे पत्रक सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रसचे नेते नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, शिवसेना नेते खासदार संजय राऊत या प्रमुख नेत्यांना हे पत्र देण्यात आले आहे.

सदर पत्रामध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.जी.जी.पारीख, ज्येष्ठ गांधीवादी नेते तुषार गांधी, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, विद्रोही चळवळीचे नेते धनाजी गुरव, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते सुभाष वारे, साहित्यिक अर्जुन डांगळे, लोकशाहीर संभाजी भगत आदी कार्यकर्त्यांसह साठहुन अधिक महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या सदर निवेदनावर सह्या आहेत. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, अविनाश पाटील, फिरोज मिठीबोरवाला, गुड्डी, शरद कदम, विशाल विमल यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.

भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या संविधान विरोधी कारभारावर पुरोगामी संस्था, संघटना कार्यकर्ते सतत आवाज उठवत आले आहेत. त्यातून जनमत घडत आले. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना बसला. महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. भाजपचा संविधान विरोधी कारभार आणि संविधान बदलण्याबाबत भाजपच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये याला मतदारांनी दिलेली ती प्रतिक्रिया होती. संविधान विरोधी कारभार सुरू असताना भाजपमध्ये असलेल्या, भाजपाला उघडपणे मदत करणाऱ्या व्यक्ती आता बदलते जनमत पाहून इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये येऊ इच्छित आहेत. त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही, त्यांना विधानसभेची तिकीटे द्यायची की नाही ? हा सर्वस्वी इंडिया आघाडीतील पक्षांचा अधिकार आहे. परंतु अशा आयाराम, गयाराम प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देवू नये, अशी विनंती सदर पत्राद्वारे सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांच्या विरोधात अनेक पुरोगामी संस्था संघटना आणि कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आयाराम कार्यकर्त्यांना इंडिया आघाडीतील पक्षांनी उमेदवारी दिल्यास त्या कार्यकर्त्यांचे सामाजिक कार्यकर्ते काम करणार नाही, असा इशाराही या पत्राद्वारे दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0