पुणे म्हाडाकडून 5 हजार घरांची लॉटरी
29 जुलै, 2022 रोजी सकाळी 10 वाजता पुण्यातील पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन, आगरकर नगर येथील कार्यालयात या लॉटरीतील सदनिकांच्या वितरणासाठीच्या अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. लॉटरीची नियमावली , मार्गदर्शक सूचना इत्यादीची माहिती म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ https://lottery.mhada.gov.in वर जाऊन इच्छूक अर्जदार पाहू शकतात.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या हस्ते पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 5 हजार 69 सदनिकांच्या विक्रीकरता पुणे म्हाडातर्फे ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ झाला आहे. ‘गो – लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत हा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सदनिका सोडतीसंदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. ही पुस्तिका https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये, तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.असे आहे वेळापत्रक-
काल 9 जून, 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून इथून पुढे एक महिना म्हणजेच 9 जुलै, 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर 10 जून, 2022 रोजी सकाळी 10 वाजेपासून ऑनलाईन अर्ज करता येईल. 10 जुलै, 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अनामत रक्कमेची स्वीकृती 11 जुलै, 2022 रात्री 11.59 पर्यंत केली जाईल. 12 जुलै, 2022 रोजी अर्जदारांना बँकेच्या कार्यालयीन वेळेत RTGS / NEFT द्वारे अनामत रक्कम भरता येईल. 21 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.किती व कोठे आहेत सदनिका-
सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत एकूण १९४५ सदनिकांचा सोडतीत समावेश असून पुणे महापालिकेच्या हद्दीत ५७५ सदनिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत १३७० सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत २७९ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेतील १७० सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेतील दोन हजार ६७५ सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत
COMMENTS