Lokmanya Tilak National Award | डॉ. टेसी थॉमस यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

HomeBreaking Newsपुणे

Lokmanya Tilak National Award | डॉ. टेसी थॉमस यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

Ganesh Kumar Mule Jul 29, 2022 3:42 PM

Pradeep Kurulkar Case | शास्त्रज्ञ कुरुलकरांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यासाठी कॉंग्रेस पक्षाची जोरदार निदर्शने
Dr. Pradeep Kurulkar Latest News | NCP Agitation | डॉं. कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची तिव्र निदर्शनें
Dr Tessie Thomas | लोकमान्यांच्या स्वदेशीच्या विचारानेच अग्नि क्षेपणास्त्राचा पाया | डॉ. टेसी थॉमस यांचे प्रतिपादन

डॉ. टेसी थॉमस यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

‘मिसाइल वुमन’ ही ओळख असलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वैमानिक प्रणालीच्या महासंचालिका आणि ‘अग्नी-4 व 5’ क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या यशाच्या शिल्पकार डॉ. टेसी थॉमस यांना यावर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सोमवार दि. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणार्‍या सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होईल. त्या दिवशी दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक तसेच टिळक स्मारक ट्रस्टचे व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भारतीय संरक्षण क्षेत्राला बळ देणारे संशोधन डॉ. टेसी थॉमस यांनी केले आहे. लांब पल्ल्याच्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या क्षेपणास्त्राचे संशोधन करुन त्यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 3 हजार 500 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. यानंतर 4 हजार, 5 हजार ते 8 हजार आणि 8 हजार ते 10 हजार किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी झाली. देशाच्या संरक्षणामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरात टेसी थॉमस यांनी मोलाचे योगदान दिले आहे. लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील ‘स्वदेशी’चे तत्त्व अधोरेखित करणार्‍या त्यांच्या कार्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी यंदाच्या पुरस्कारासाठी डॉ. थॉमस यांची एकमताने निवड केली आहे, असे डॉ. दीपक टिळक यांनी नमूद केले.
स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये, असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरुप असून टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. चंद्रकांत पाटील यांच्यासह टिळक स्मारक ट्रस्टचे विश्‍वस्त, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित असतील.
1983 पासून राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी एस.एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन.आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. कैलासावडिवू सिवन, बाबा कल्याणी, सोनम वांगचुक, डॉ. सायरस पूनावाला यांच्यासह अन्य दिग्गजांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
टेसी थॉमस भारतीय संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या अग्नी-4 व 5 क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या संचालिका असून या पदावरील त्या पहिल्या महिला आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 3500 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. त्यांना भारताची ’मिसाइल वुमन’ म्हणून ओळखले जाते. ‘अग्नी -4’ क्षेपणास्त्राने नऊशे किलोमीटरची उंची गाठली आणि नंतर ते बंगालच्या उपसागरातील 3,000 किलोमीटर अंतरावरील नियोजित लक्ष्यावर अचूक आदळले. या यशात डॉ. थॉमस यांची भूमिका महत्त्वाची राहिली.
टेसी थॉमस यांचा जन्म एप्रिल 1963 मध्ये केरळमधील अलाप्पुझा येथे झाला.  मदर टेरेसा यांच्या नावावरून त्यांचे टेसी हे नाव ठेवण्यात आले. टेसी थॉमस 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांना पक्षाघात झाला. या विकारामुळे त्यांचा उजवा हात काम करत नसे. टेसी थॉमस यांची आई शिक्षिका होती. अशा विपरित परिस्थितीत संघर्ष करीत टेसी थॉमस मोठ्या झाल्या.  थुंबा क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्राच्या परिसरात राहात असल्याने टेसी थॉमस यांना लहानपणापासूनच विमानांचे आणि क्षेपणास्त्रांचे आकर्षण होते.
टेसी थॉमस यांनी 1985 मध्ये कालिकत विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील बी.टेक. तर पुण्यातील डिफेन्स इन्स्टिटयूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीमधून 1986 मध्ये ‘लक्ष्याधारित क्षेपणास्त्र’ या विषयात अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी मिळवली. हैदराबादमधील जेएनटीयूमधून त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. ‘इग्नू’मधून त्यांनी एम.बी.ए. पूर्ण केले आहे.
1988 मध्ये त्या ‘डीआरडीओ’मध्ये रूजू झाल्या.  डीआरडीओतील अग्‍नी क्षेपणास्त्राच्या नवीन पिढीच्या प्रकल्पासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांची नेमणूक केली. टेसी 3,000 किमी लांबीच्या अग्नी-3 क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या साहाय्यक प्रकल्प संचालक होत्या. अग्नी-4 आणि अग्नी- 5 साठी त्यांनी प्रकल्प संचालक म्हणून काम पाहिले. डॉ. कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉ. थॉमस यांनी वाटचाल केली. 2018 मध्ये डीआरडीओच्या वैमानिक प्रणालीच्या त्या महासंचालिका बनल्या.
‘डीआरडीओ’ने उत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून त्यांना गौरविले आहे. 2012 मध्ये मेरी क्युरी विज्ञान पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. केरळ सरकारने 2014 मध्ये वनिता रत्नम पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. आंध्र प्रदेश सायन्स काँग्रेस, आंध्र प्रदेश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स यांच्यासह असंख्य संस्थांनी त्यांना गौरविले आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.