राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे ‘‘जोडो मारो आंदोलन’’
पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली एस. एस. पी. एम. एस. शाळा, शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ‘‘जोडो मारो आंदोलन’’ करण्यात आले.
काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी वक्तव्य केले की, ‘समर्थ रामदास नसते तर शिवाजींना कोणी विचारलं नसते’. अशा प्रकारे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी शब्दात उल्लेख करून महाराजांचा आणि देशाचा अपमान केला आहे. राज्यपांल सातत्याने वादग्रस्त विधाने करीत आहेत आणि मोदी सरकार त्यांची पाठराखण करीत आहे. भारतीय जनता पक्ष राज्यपालांच्या वक्तव्यावर मौन बाळगून आहेत. राज्यपालांनी त्वरीत माफी मागावी अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’
यावेळी बोलताना नगरसेवक अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्राचे राज्यपालांनी कुठलेही पुरावे नसताना असे सांगितले की, शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाली. खोटे बोलून जनतेची दिशाभुल करणे हा भाजपाचा अंजेडा राज्यपाल अतिशय चोखपणे राबवित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी शब्दात उल्लेख करण्याची मजाल राज्यपालांनी केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा घ्यावा. जर तसे झाले नाही तर आम्ही महाराष्ट्रात राज्यपालांचा कार्यक्रम होऊ देणार नाही याची नोंद मोदी सरकारने घ्यावी.’’
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, गटनेते आबा बागुल, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, अनिल सोंडकर, शेखर कपोते, पुजा आनंद, विशाल मलके, नीता रजपूत, सोनाली मारणे, हाजी जाकीर शेख, नगरसेवक रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, संगिता तिवारी, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, रजनी त्रिभुवन, अरूण वाघमारे, राजाभाऊ कदम, प्रकाश पवार, रामदास मारणे, बाळासाहेब अमराळे, मुख्तार शेख, साहिल केदारी, यासीर बागवे, नारायण पाटोळे, राजू साठे, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, प्रविण करपे, विजय खळदकर, रमेश सकट, विजय जाधव, वाल्मिक जगताप, अजित जाधव, अविनाश अडसूळ, मुन्नाभाई शेख, क्लेमेंट लाजरस, रॉर्बट डेव्हिड, परवेज तांबोळी, सुरेश कांबळे, विनोद रणपिसे गणेश भंडारी, बबलू कोळी, राजू गायकवाड, ॲड. राजश्री अडसूळ, सिमा महाडिक, शारदा वीर, फैय्याज शेख, रवी मोहिते आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS