JN.1 Corona New Variant | ‘जेएन-१’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी | आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

HomeपुणेBreaking News

JN.1 Corona New Variant | ‘जेएन-१’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी | आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

कारभारी वृत्तसेवा Dec 28, 2023 3:52 PM

  Polio vaccination campaign will continue till March 9 in Pune Municipal Corporation jurisdiction
Polio Vaccine Date in Pune 2024 | आपल्या बाळाला ३ मार्चला पोलिओची लस अवश्य द्या
Arogyavardhini Center | आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय आरोग्य अधिकारी यांची रिक्त पदे भरणार – डॉ. तानाजी सावंत, आरोग्य मंत्री

JN.1 Corona New Variant | ‘जेएन-१’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी | आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

 

JN.1 Corona New Variant : राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ (Covid JN.1) या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ (Corona Task Force) स्थापन करण्यात आली असून या टास्क फोर्सची पहिली बैठक आज (गुरुवार) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Dr Tanaji Sawant) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कोरोनाचा ‘जेएन-१’ (JN .1)हा नवीन उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करावे, असे आवाहन प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे. (Corona New Variant)

‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आली असून, या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) साथी आणि संसर्गजन्य विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज झालेल्या बैठकीस आरोग्य विभागाचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमार आणि टास्क फोर्स सदस्य उपस्थित होते.

‘जेएन-१’ साठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असली तरी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीनिशी सतर्क राहण्याच्या सूचना डॉ. सावंत यांनी बैठकीत दिल्या. संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे याव्यात, त्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते योग्य उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नवीन वर्षाचे आगमन होणार असल्यामुळे त्याचे स्वागत करण्यासाठी नागरिक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळी जातात. मात्र नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी कोविड अनुरूप नियमांचे पालन करणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. जोखमीच्या रुग्णांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहनही मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे.

नववर्षाच्या पर्शवभूमीवर विषाणू संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता पुढील १० ते १५ दिवस आरोग्य यंत्रणेने आणि नागरिकांनी सतर्क रहावे. टास्क फोर्सकडून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक उपाययोजना सूचविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. गंगाखेडकर यांनी यावेळी सांगितले की, जेएन-१ या कोरोनाच्या उपप्रकारामुळे मोठा धोका निर्माण होईल अशी परिस्थिती सध्या नाही. मात्र तरीही वयोवृद्ध नागरिक आणि गंभीर आजाराच्या रुग्णांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असून लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. उपचारामध्ये एकसमानता राखण्यासाठी औषध नियमावली, तसेच आवश्यक ती मार्गदर्शक नियमावली लवकरच टास्क फोर्सकडून सादर केली जाईल.

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. वर्षा पोतदार, डॉ. डी. बी. कदम या टास्क फोर्सच्या सदस्यांनीही बैठकीत आपले मत व्यक्त केले.

बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि आरोग्य विभागाच्या तयारी संदर्भात सादरीकरण केले.

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, तसेच टास्क फोर्सचे सदस्य नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते, पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेतील (एनआयव्ही) डॉ. वर्षा पोतदार, नवले वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. डी. बी. कदम, आरोग्य विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी या बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.