दुसर्या धर्माचा द्वेष बाळगणे या देशाची संस्कृती नाही
: अजित पवारांचा टोला
पुणे : आपल्या भारत देशात प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असणे , यात काही गैर नाही. परंतु आपल्या धर्माचा अभिमान बाळगत असताना दुसर्या धर्माचा द्वेष बाळगणे या देशाची संस्कृती नाही. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील वातावरण चुकीच्या दिशेने जात असून या वातावरणामुळे धार्मिक व प्रांतिक सख्य धोक्यात आले असून ही गोष्ट निश्चितच भूषावह नाही. असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने कर्वेनगर येथील हनुमान मंदिरात मुस्लिम बांधवांच्या हस्ते हनुमान जयंतीची आरती घेण्यात आली व या मंदिराच्या प्रांगणात हिंदू – मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तार देण्यात आला. यावेळी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांनी आपल्या पवित्र रोजाचा उपवास सोडला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सामाजिक सलोख्यासाठी घेतलेल्या या अभिनव कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतर पाटील , खासदार सुप्रियाताई सुळे,महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर , शहराध्यक्ष प्रशांत जगताप,आमदार चेतन तुपे आदी नेत्यांसह प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व मोठ्या संख्येने सर्वधर्मीय बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, “विविधतेतून एकतेने नटलेल्या भारतभूमीमध्ये सर्व धर्म, प्रांत व जातीचे नागरिक गुण्या गोविंदाने राहतात.या धर्म जात प्रांत यांचे वेगवेगळे सण असून सर्व नागरिक एकमेकांचे सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात प्रत्येक जण आपापल्या जातीची ,धर्माची परंपरा मोठ्या निष्ठेने पार पाडतात. अशा आपल्या भारत देशात प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असणे , यात काही गैर नाही. परंतु आपल्या धर्माचा अभिमान बाळगत असताना दुसर्या धर्माचा द्वेष बाळगणे या देशाची संस्कृती नाही. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील वातावरण चुकीच्या दिशेने जात असून या वातावरणामुळे धार्मिक व प्रांतिक सख्य धोक्यात आले असून ही गोष्ट निश्चितच भूषावह नाही.या द्वेषाची सुरवात उत्तरेतील राज्यांमध्ये झाली असली तरी गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात देखील काही मंडळी अश्या गोष्टी करू पाहत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या देशातील सलोखा टिकवून ठेवणे ही देशातील सर्व सजग नागरिकांची जबाबदारी आहे म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे सांगितले”.
या कार्यक्रमात इफ्तारपूर्वी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पूर्ण हनुमान चालीसा पठण केले तर सोहेल शेख यांनी नमाज पठण केले.
COMMENTS