बोट दाखवा, बोट थांबवा | भाजपाच्या विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपरोधिक आंदोलन
पुणे शहरात सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते, वाहतूक, ड्रेनेज व्यवस्था आदींच्या बाबतीतील महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या नियोजनाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून त्याचा त्रास नागरीकांना होत आहे. याचा निषेध करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या समोर खरीखुरी बोट आणि ती वल्हवत ‘बोट दाखवा,बोट थांबवा’ हे उपरोधिक आंदोलन करण्यात आले.
शहरात झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी साठले आहे. त्यातच अनेक ठिकाणी महापालिकेने कसलाही विचार न करता खोदकाम केले आहे. या खड्ड्यांमध्येही पाणी साठले असून भविष्यात येथेही एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाच्या या नियोजनशून्य कारभाराचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांच्या नेतूत्वाखाली आंदोलन करण्यात आहे याप्रंगी बोलताना ते म्हणाले की, भाजपाने गेली पाच वर्षांत अतिशय नियोजशून्य पद्धतीने कारभार करुन पुण्यासारख्या सुंदर शहराचे वाटोळे केले. शहरांतील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साठून शहराला एखाद्या तळ्याचे रुप आले होते. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. ही अतिशय दारुण अवस्था असून भाजपाने पुणे शहर अक्षरशः बुडविले आहे. एवढेच नाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पुण्यातील भाजपा नेत्यांनी हे शहर बकाल करुन खुद्द पंतप्रधानांना खोटे पाडले आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या शब्दाचाही मान त्यांना ठेवता आला नाही. याच शहरात स्मार्ट सिटी योजनेचे उद्घाटन करताना पंतप्रधान म्हणाले होते की, शहरांमध्ये गरीबीला पचविण्याची ताकद आहे. त्यामुळे शहरांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करणे आवश्यक आहे. पण पुण्यातील भाजपा नेत्यांनी पायाभूत सुविधांसाठी आलेला पैसा गिळंकृत करुन आपली गरीबी पचविली. शहराच्या विकासाला तिलांजली दिल्यामुळे आता पुणेकरांना बस, रिक्षा किंवा मेट्रोची नाही तर बोटीची गरज पडणार असून पुण्यामध्ये भविष्यात बोट दाखवा, बोट थांबवा ही योजना केंद्र व राज्य सरकारने हाती घ्यायला हवी असा सल्ला देखील देशमुख यांनी दिला.
प्रवक्ते प्रदीप देशमुख , मूणालिनी वाणी ,विनोद पवार , उदय महाले , संतोष नांगरे ,भूषण बधे, वनिता जगताप , मंगल पवार , शालीनीताई जगताप , स्वप्निल जोशी , मीना पवार, भावना पाटील , सुरेश खाटपे, सुगंधा तिकोने व इतर प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते